पंचगंगा नदीला पूर; चौघेजण बुडाले

कोल्हापूर- जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीला पूर आला आहे. या नदीच्या प्रवाहामुळे एक जीप वाहून गेली. यामध्ये‍ चौघेजण अडकले होते. त्यांना पुरामुळे पाण्या बाहेर येता न आल्याने जीपसह हे चौघेजण पूरात वाहून गेली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना शुक्रवार सकाळी कोल्हापूरमधील शिंगमापूर नाका परिसरात घडली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिलहयात जोरदार पावसाने हजेरी लावली. कोल्हापुरातही पावसाची संततधार सुरूच आहे. या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. कोल्हापूरमधील शिंगमापूर नाका येथे पंचगंगा नदीच्या प्रवाहात एक जीप अडकून पडली होती. या ठिकाणी पाण्याचा जोर वाढल्यामुळे जीपमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. पाण्याच्या लोटामुळे जीप नदीत वाहून गेली. त्या‍मुळे जीपमधील चार प्रवासी वाहून गेले. त्यामुळे त्यांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुरामुळे वाहून गेलेल्या या चौघांचा शोध सुरू आहे. जोरदार होत असलेल्या पावसामुळे आगामी काळात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Leave a Comment