तुम्ही गाडी घ्या – हप्ता भरेल कंपनी

पुणे दि.१२ – आपली स्वतःची गाडी असावी अशी अनेकांची इच्छा असते. अगदी कॅश देऊन जमले नाही तर हप्त्यावर तरी गाडी घ्यावी असेही अनेकांना वाटते. पण गाडी घ्यायची आणि हप्ते मात्र कंपनी भरेल अशी काही स्कीम असेल तर? मग अनेकांची गाडीची आस सहज पूर्ण होऊ शकेल नाही का? पण अशी योजना आणणार कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही बातमी अवश्य वाचा.

पुण्यातील ड्रीमर्स मिडीया अॅन्ड अॅडव्हरटायझिंग कंपनीने ही संधी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. मात्र त्यासाठी कांही अटी पाळाव्या लागणार आहेत. यात तुम्ही सहा लाख रूपये किमतीपर्यंतची कुठलीही कार त्वरीत घरी नेऊ शकणार आहात. पाच वर्षांसाठीच्या लोनवर ही योजना लागू असून त्यातील पहिली तीन वर्षे तुमचा हप्ता ही कंपनी भरणार आहे. त्यानंतर दोन वर्षे तुम्हाला हप्ते भरावे लागतील. तसेच गाडी घेताना किमतीच्या २५ टक्के रक्कम तुम्हाला सुरवातीला भरावी लागेल.

ही ड्रीमर्स मिडिया कंपनी काय म्हणून तुमच्यासाठी हप्ते भरणार? तर त्यासाठी त्यांची अट अशी आहे की तुम्ही तुमची गाडी मोठ्या शहरात राहात असाल तर महिन्याला किमान १५०० किमी व छोट्या शहरात राहात असाल तर किमान हजार ते १२०० किमी फिरविली पाहिजे. कारण कंपनी तुमच्या गाडीच्या ४० ते ६० टक्के भागावर त्यांच्या क्लायंटच्या उत्पादनांच्या जाहिरातीची स्टीकर्स लावणार आहे. म्हणजे जाहिरात ही झाली, व्यवसायही झाला आणि तुम्हाला स्वस्तात आणि तीन वर्षे फुकट हप्त्यात गाडीही मिळाली. आहे ना भन्नाट आयडिया?

ही योजना कधी येणार म्हणताय? मग थोडी प्रतीक्षा करा. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कंपनी ही योजना आणणार आहे.