हा कायदा झालाच पाहिजे

महाराष्ट्र सरकारच्या अंध:श्रद्धा विरोधी विधेयकाला फाटे फोडण्याचा काही लोकांचा उद्योग चालला आहे. त्यांना हा कायदा नको आहे कारण त्यामुळे त्यांच्या मनातल्या आणि ते समाजात प्रसार करीत असलेल्या भाकड कल्पनांना शह बसणार आहे. आज काही हिंदुत्ववादी संघटना या विधेयकाला विरोध करायला पुढे सरसावल्या आहेत. त्यातल्या सनातन प्रभात सारख्या संघटनांचा विरोध समजून घेता येतो कारण ही संघटना बोलून चालून सनातनी आहे. आपल्या धर्मातल्या सार्‍या दुष्ट रूढींना आणि कालबाह्य परंपरांना आधुनिक रूप देऊन पुन्हा समाजावर थोपण्याचा त्यांचा उद्योगच आहे. धर्मातल्या रूढींचा बदलत्या काळाच्या संदर्भात फेर विचार केला पाहिजे असा विचार मांडणार्‍या आगरकर, फुले अशा समाजसुधारकांमुळे आपला समाज आज सुधारला आहे पण, या समाजाला पुन्हा त्या काळ्या कालखंडात नेण्याचा या सनातन प्रभातचा डाव आहे. अशा संघटनेने या अंध:श्रद्धा विरोधी कायद्याला विरोध होत असेल तर तो त्यांच्या स्वरूपाला धरूनच आहे पण वारकरी संप्रदायातल्या काही संतांनी, महाराजांनी आणि हिंेदुत्ववादी संघटनांनी या विधेयकाला विरोध करावा हे त्या त्या तत्त्वज्ञानाशी विसंगत आहे.

आज स्वातंत्र्यवीर सावरकर हयात असते तर त्यांनी या विधेयकाला पाठींबा दिलाच असता पण ते मागून घेऊन नीट वाचून त्यातल्या काही कलमांत सुधारणा सुचवून ती कलमे अधिक कडक केली असती. सावरकर विज्ञानवादी होते. त्यांना समाजातले धर्माच्या नावावर चालणारे ढोंग धत्तुरे अजीबात मान्य नव्हते. त्यांनी अनेक साधूंचा, त्यांच्या कथित चमत्काराचा आणि बुवाबाजीचा पडदा नेहमीच फाडला आहे. पण या सावरकरांचा उदो उदो करणारे हे हिंदुत्ववादी या विधेयकाला विरोध करीत आहेत. त्यांना सावरकर काय म्हणत होते हे माहीत नाही असे नाही पण सावरकरांचे धर्माच्या बाबतीतले हे तत्त्वज्ञान त्यांना मानवत नाही, पेलवत नाही. सामान्य माणूस धर्मवेडा असतो. तो परंपरा आणि रूढींचा त्याग करण्यास सहजा सहजी तयार होत नाही पण त्यांना तसे काही सांगायला गेलो तर तो नाराज होतो. आजकाल कोणत्याच पक्षाचे नेते समाजाला काही नवे शिकवण्यास तयार नाहीत. म्हणून या हिंदुत्ववादी पक्षांनीही समाजाची उगाच नाराजी नको म्हणून या विधेयकाला विरोध करायला तर सुरूवात केली आहेच पण लोक अधिक खुष व्हावेत म्हणून या विधेयकाला धर्म विरोधी ठरवून लोकांना भडकवायला सुरूवात केली आहे.

वारकरी संप्रदायाचीही अवस्था अशीच आहे. त्यांनी अंध:श्रद्धा विरोधी विरोध करायला नको आहे कारण या विधेयकाने संतांनी सांगितलेला विचारच पुढे नेला जाणार आहे. आपण संतांच्या साहित्यावर नजर टाकतो तेव्हा संतांना धर्माच्या नावावर चालणारे ढोंंगधत्तुरे मान्य नव्हते असेच लक्षात येते. म्हणजे या विधेयकात संताचाच विचार मांडलेला आहे. या लोकांचा या कायद्याला होणारा विरोध हा विनाकारण आहे पण ते आपल्या या विरोधाला वैचारिक अधिष्ठान देण्याचा निष्फळ प्रयत्न करीत आहेत. अंध:श्रद्धा म्हणजे नेमके काय हे अजून ठरलेले नाही, श्रद्धा आणि अंध:श्रद्धा यातली सीमारेषा ही धूसर आहे, एकाला जी श्रद्धा वाटते ते दुसर्‍याला अंध:श्रद्धा वाटते म्हणजे श्रद्धा ही व्यक्तिसापेक्ष असते असे तात्त्विक दळण दळायला या लोकांनी सुरूवात केली आहे आणि आपला या विधेयकाला असलेला विरोध हा वैैचारिक आहे असे भासवायला सुरूवात केली आहे. पण या शाब्दिक काथ्याकुटात काही अर्थ नाही. काही अंध:श्रद्धा या व्यक्तिनिरपेक्ष असतात. डोक्यावर फरशीचे दोन तुकडे आपटले म्हणजे रोग दुरुस्त होत नाहीत, सर्जरीचे कसलेही शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीने केवळ बोटाने शस्त्रक्रिया करतो म्हणणे हे थोतांड आहे. या गोष्टी कोणालाच खर्‍या वाटणार्‍या नाहीत. त्यांच्यावर बंदी आणून त्यांना शिक्षा घडवली पाहिजे. या कामात कसलेही वैचारिक मतभेद आडवे येेण्याची सुतराम शक्यता नाही.

हे विधेयक गेल्या अकरा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याला मधूनच मान्यता मिळाल्यासारखे वाटते पण कोणी तरी काही तरी अडथळा आणतो. ते प्रलंबित राहून चालणार नाही कारण ते समाजाच्या हिताचे आहे. आज आपल्या देशातल्या लोकांची प्रगती न होण्यामागे जी अनेक कारणे आहेत त्यात अंध:श्रद्धा हे एक मोठे कारण आहे. समाजात अनेक प्रकारच्या अंध:श्रद्धा रूढ आहेत आणि त्या पायी लोकांचे जीवन खडतर बनलेले आहे. अनेकांची अनेक प्रकारे फसणूक होत आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाण जसे वाढत जाईल तशा या अंध:श्रद्धा कमी होतील असे वाटले होते पण उलट त्या वाढत आहेत. कारण या अंध:श्रद्धांना काही तरी वैज्ञानिक अर्थ आहे असे या सुशिक्षित लोकांना सांगितले जायला लागले आहे. अडाणी, खेडूत आणि अशिक्षित लोक तर अंध:श्रद्धांच्या आहारी गेलेले आहेतच पण सुशिक्षितही त्यापेक्षा काही वेगळे नाहीत. एकदा सुशिक्षितही अशा दुष्ट रूढींच्या आहारी जायला लागले की त्यांचे अनुकरण करीत अशिक्षित समाजही त्यांचे पालन करायला लागतो. कारण ज्या अर्थी एवढे शिकलेले लोक या रूढी पाळतात त्या अर्थी त्यात काही तरी अर्थ असणारच असे त्यांना वाटायला लागते.

वैद्यकीय उपचाराच्या बाबतीत तर फारच अंध:श्रद्धा आहेत. अजूनही आजार झाल्यास अंगारा लावला जातो. ताईत घातले जातात. समाजात असे अनेक कथित साधू आणि भोंदू महाराज लोकांना मंत्राने आजार बरे करण्याचे आमिष दाखवून कमायी करीत आहेत. अनेक महिलांचे लैंगिक शोषणही केले जात आहे. या सर्वांना चाप लावला पाहिजे. न लावला तर आपल्या प्रगतीत तो मोठा अडथळा ठरणार आहे. काही लोकांनी हे दुष्परिणाम न पाहता हे विधेयक धर्माच्या विरोेधात असल्याची आवई उठवली आहे. हे विधेयक मंजूर होऊन ते लागू झाल्यास कोणालाही सत्यनारायण पूजा करता येणार नाही, आपल्या घरात आपल्या मर्जीने यज्ञ करणे हाही गुन्हा ठरेल, देवाचे नाव घेता येणार नाही, कीर्तन केले की अटक होईल अशी अतिशयोक्त विधाने करून हे लोक धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना या विधेयकाच्या विरोधात भडकवत आहेत. आपल्या देशातले लोक धर्माचे मोठे अभिमानी आहेत. त्यांच्या जीवनात धर्माला फार मोठे स्थान आहे. आता आता तर या धर्माने मोठेच विपरीत वळण घेेतले आहे. धर्मातल्या तत्त्वज्ञानाला महत्त्व राहिलेले नाही. केवळ कर्मकांडांना महत्त्व आले आहे आणि ही कर्मकांडे अंध:श्रद्धांना जन्म देणारी आहेत. ती काळाच्या बदलानुसार बदलली जात नाहीत. महाराष्ट्राने या बाबत कायदा करून समाजातल्या अंध:श्रद्धांना कायमचा रामराम ठोकायचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा कायदा करण्यास तयार असणारे महाराष्ट्र हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे. हा कायदा महाराष्ट्रात झाला तर त्याचे अनुकरण अन्यही राज्ये करतील आणि आपल्या देशातून या अंध:श्रद्धांना कायमचा रामराम ठोकू शकू.