मुंबई स्फोटांना सात वर्ष पूर्ण; कडेकोट बंदोबस्त

मुंबई: मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांना गुरूवारी सात वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सातव्या स्मृतिदिनानिमित्त मुंबइमध्ये विविध ठिकाणी श्रद़ाजंलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकल ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटांना सात वर्ष उलटले तरीपण या स्फोटातील अनेक पीडितांना अद्याप न्यायापासून वंचित रहावे लागत आहे.

मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. ११ जुलैला संध्याकाळी ऐन गर्दीच्यावेळी पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड, माहिम, बांद्रा, सांताक्रूझ, जोगेश्वरी, बोरिवली आणि भाईंदर या स्टेशन्सवर बॉम्बस्फोट झाले होते. या साखळी स्फोटात १८८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते तर ८०० हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेला सात वर्ष उलटले तरीपण स्फोटातील अनेक पीडित अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान, रविवारी बिहारमधील बोधगयात दहशतवादी हल्ला झाला आहे. यावेळेसच मुंबईत स्फोट करण्याची धमकी अतिरेक्यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई शहरात सर्वत्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शहरात सातव्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माहिम स्टेशनवर पुष्पांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तर दादरच्या वसंत स्मृती येथे संध्याकाळी सहा वाजता दुर्घटनेतील पीडितांच्या संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणावर सर्वत्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

Leave a Comment