नवी दिल्ली दि.११ – आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकांत टिव्ही शो मधून होणारे वादविवाद आणि चर्चा नेहमीप्रमाणेच महत्त्वाच्या ठरणार आहेत. याची जाणीव झाल्याने काँग्रेसने या वादविवादात पक्षाची बाजू प्रभावी पणे आणि पूर्ण माहितीनिशी मांडू शकतील असे प्रवक्ते तयार करण्याचे मनावर घेतले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत पुढाकार घेतला असून येत्या २२ व २३ जुलैला पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
विरोधी पक्षांकडे व त्यातही भाजपकडे तडफदार प्रवक्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. या प्रवक्तयांशी वादविवाद करताना काँग्रेस प्रवक्ते बरेचवेळा कमी पडतात हे राहुल गांथी यांच्या लक्षात आले आहे असे काँग्रेस कम्युनिकेशन प्रमुख अजय माखन यांनी सांगितले. ते म्हणाले, यामुळेच ही कार्यशाळा घेतली जात आहे. यात पाच राज्यातील प्रवक्ते, राष्ट्रीय प्रवक्ते व काँग्रेसचे टिव्ही शो मदून प्रतिनिधित्व करण्यासाठी र्शार्टलिस्ट केले गेलेले अन्य ३६ प्रवक्ते सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेत सरकारच्या धोरणांची ओळख त्यांना करून दिली जाईल तसेच अन्न सुरक्षा विधेयकासारख्या निर्णयांवर त्यांना योग्य त्या माहितीसह तसेच आकडेवारीसह बोलता येईल अशी तयारी करून घेतली जाणार आहे. विविध राजकीय प्रश्न, सरकारच्या महत्त्वाच्या पॉलिसी यासंदर्भात जनतेपुढे तसेच माध्यमांपुढे त्यांना व्यवस्थित खुलासा करता यावा याची काळजीही घेतली जाणार आहे. तसेच पक्षाच्या संशोधन कक्षाने विविध विषयांवर तयार केलेली किवा जमा केलेली कागदपत्रे त्यांना पुरविली जाणार आहेत.
जेव्हा एखाद्या टिव्ही शोवरील वादविवाद कार्यक्रमाला त्यांना आमंत्रित केले जाईल तेव्हा जो विषय चर्चेला असेल त्यासंबंधीची सर्व महत्त्वाची माहिती आणि आकडेवारीही त्यांना पुरविली जाणार आहे. राज्य पातळीवरही कॉंग्रेसमध्ये चांगले टॅलंट आहे. अशा तरूणांना शोधून त्यांचा वापर पक्षाच्या पॉलिसी प्रभावीपणे मांडण्यासाठी करून घेतला जाणार आहे असे सांगून माखन म्हणाले की उदाहरण द्यायचे तर केरळचे सुरेशबाबू आणि गुजराथच्या अमीबेन याज्ञिक यांचे देता येईल. त्यांचा जनमानसावर चांगला प्रभाव आहे.
या उपक्रमावर उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बारीक लक्ष ठेवले आहे व तेच मॉनिटरही करत आहेत. प्रवक्त्यांची कौशल्ये आणि ज्ञान वाढविण्यावर भर देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत आणि येत्या कांही दिवसांतच कॉंग्रेस प्रवक्त्यांमध्ये पडलेला चांगला फरक जनतेला जाणवेल.