फेसबुक अकौंट कॅन्सल करा – मरिया वरेला

कॅराकस दि.११ – व्हेनेझुएलाच्या तुरुंगमंत्री मरिया इरिस वरेला यांनी देशातील नागरिकांनी त्यांची फेसबुक अकौंट बंद करून टाकावीत अशी विनंती जनतेला केली आहे. अमेरिका या अकौंटवर नजर ठेवून आहे हे आपल्याला समजले आहे, त्यामुळे तुम्ही अमेरिकेचे टार्गेट बनण्याची शक्यता खूपच मोठी असल्याने ही अकौंट बंद करा असे त्यांचे म्हणणे आहे. त्या म्हणतात ही अकौंट वापरून तुम्ही तुमच्या नकळतच अमेरिकेच्या सीआयए गुप्तचर संस्थेला मदत करता आहात आणि या गुप्तचर संस्थांचे अनवधानाने का होईना तुम्ही खबरे बनत आहात याची जाणीव ठेवा आणि फेसबुकचा वापर बंद करा.

मारिया म्हणतात स्नोडेनचे उदाहरण आमच्या जनतेसमोर अगदी ताजे आहे. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यावर कोणी घाला घालत असेल तर त्याला विरोध केलाच पाहिजे. ज्यांची फेसबुक अकौंटस आहेत त्यांनी त्यांची वैयक्तीक माहिती गुप्तरित्या जाणून घेतल्याप्रकरणी न्यायालयात दावे करावेत आणि त्यासाठी नुकसानभरपाई अमेरिकेकडे मागावी असेही जनतेला मी आवाहन करते. या नुकसानभरपाईमुळे अमेरिका कर्जबाजारी झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे.

दरम्यान व्हेनेझुएलात राजकीय आश्रय घेण्यास संमती दिल्यानंतर एडवर्ड स्नोडेन कोणत्याही क्षणी मास्कोतून बाहेर पडून आपली स्वातंत्र्याची झेप घेईल असे विकिलिक्सने जाहीर केले आहे. मात्र तो मास्कोबाहेर कसा पडणार याची माहिती देण्यास नकार दिला आहे. गेले दोन आठवडे स्नोडेनने मास्को विमानतळावर आश्रय घेतला आहे आणि तो हाँगकाँगहून आलेला असल्याने त्याच्याकडे व्हॅलिड पासपोर्ट नाही असेही समजते.

Leave a Comment