नवी दिल्ली: दिल्ली येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी आज न्यायालयाचा पहिला निकाल लागणार आहे. सहा आरोपींपैकी अल्पवयीन आरोपीच्या शिक्षेवर गुरूवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. गुन्हा करतेवेळी हा आरोपी अल्पवयीन होता. त्यामुळे बालगुन्हेगारी कायद्याअंतर्गत आज या आरोपीचा फैसला होणार आहे.
नवी दिल्ली येथे १६ डिसेंबरला चालत्या बसमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. गंभीर अवस्थेत तिला एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारांसाठी तिला सिंगापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना तिचा मत्यू झाला होता.
या बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर बलात्कार, हत्या आणि अपहरणासह आणखी काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र त्या अल्पवयीन आरोपीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या खटल्यात तो जर दोषी आढळून आल तर त्याला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. यादरम्यान त्याला बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात येईल. त्यामुळे आज कोर्टाचा काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.