एमपीएससी डेटा करप्ट प्रकरणी दोघांना अटक

नवी मुंबई – एमपीएससी परीक्षाचा डेटा करप्ट केल्याप्रकरणी ऑनलाईन सेवा पुरवणार्‍या कंपनीच्या संचालकासह दोघांना अटक केली आहे. सायबर सेलने नवी मुंबईच्या महापेमधून त्यांना ताब्यात घेतले. विवेक चंदेल आणि वीरेंद्र असोलकर अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. विवेक चंदेल हे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीद्वारे राज्य लोकसेवा आयोगाला ऑनलाईन सेवा पुरवली जाते. तर वीरेंद्र असोलकर हे आयटीतज्ञ आहेत. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली जावी म्हणूनच, काही अज्ञातांनी डेटा करप्ट केल्याची माहिती, आयोगाच्या अधिकार्‍यांनी दिली होती. त्यानंतर एमपीएससी प्रशासनाने या प्रकरणाची सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती. आयागोच्या तक्रारीनंतर सायबर सेलने ही कारवाई केली. आयोगाने चंदेलांच्या कंपनीला 2010 सालापासून ऑनलाईन सेवा पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं. एप्रिल महिन्यात झालेल्या डेटा करप्ट झाल्याप्रकरणी आयोगाने चंदेला यांना विचारणा केली. व्हायरसमुळे डेटा करप्ट झाल्याचं कारण चंदेलांनी दिलं होतं. पण परीक्षार्थींचे अर्जच करप्ट झाल्याने आयोगाला ही परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. दरम्यान चंदेलांच्या कंपनीकड़ून एप्रिलचाच नव्हे तर मागील तीन वर्षांचा डेटा गहाळ झाल्याचं आयोगाच्या लक्षात आलं. त्यानंतर आयोगाने चंदेलांविरोधात सायबर सेलकडे तक्रार केली होती.

Leave a Comment