’एनआरआय’च्या मित्रांनी वाजविली आहे मोदींची टिमकी

मुंबई – गुजरातच्या विकासाचे मॉडेल म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून भाजपचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांच्या अनिवासी भारतीय मित्रांनी मार्केटिंगच्या तंत्राचा वापर करून त्यांची टिमकी वाजवलेली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर तोफ डागली. महिला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की , मोदींच्या माध्यमातून आपला कॉर्पोरेट अजेंडा राबवण्यास उत्सुक असलेल्यांनी या मार्केटिंग कॅम्पेनवर कोट्यवधी खर्च केले आहेत. उत्तराखंडातील पुरातून गुजरातमधील 15 हजार नागरिकांना मोदींनी सुखरुप बाहेर काढले अशा दाव्यांमुळे मोदी आणि त्यांच्या अनिवासी मित्रांच्या मार्केटिंग कॅम्पेनचे पितळ उघडे पडले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, औद्योगिक प्रगती, देशी व परदेशी भांडवलाची गुंतवणूक या निकषांवर महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या निकषावर हरयाणानंतर देशात महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. मात्र ‘ पीआर ’ गिरी करून ’ आम्हीच देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ’ असा दावा जर आमच्या शेजार्‍याला करायचा असेल तर महाराष्ट्राला आक्षेप घेण्याचे कारण नाही.

भाजपने सत्तेवर येण्याकरिता पुन्हा राम मंदिर ,समान नागरी कायदा व घटनेचे 370वे कलम या आपल्या मूळ अजेंड्याकडे वळणार असल्याचे स्पष्ट केले आहे ,असे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. तिसरे महिला धोरण जाहीर करण्यासाठी धोरणाचा मसुदा लोकांसमोर मांडला असून त्यावर खूप सूचना आलेल्या आहेत. लवकरच मनधिमंडळात महिला धोरण जाहीर करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

Leave a Comment