मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिने द डर्टी पिक्चर या चित्रपटाच्या कन्नड रिमेकमध्ये काम करण्यासाठी एक कोटी रुपये मानधन घेतले असून याबाबतीत तिने कन्नड चित्रपटसृष्टीतल्या सर्व तारकांना मागे टाकले आहे. या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत विद्या बालनने साकार केलेली सिल्क स्मिताची भूमिका वीणा मलिक साकार करणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिल्क स्मिताच्या जीवनावरील आधारित चित्रपट तयारक करण्याची चढाओढ लागली आहे. कारण तिच्यावरचा द डर्टी पिक्चर हा विद्या बालनचा चित्रपट बराच लोकप्रिय झाला आहे. या लोकप्रियतेचा विचार करून काही चित्रपट निर्मात्यांनी त्याचा कन्नड रिमेक करण्याचा घाट घातला आहे. त्यात सिल्क स्मिताची भूमिका साकार करणारी वीणा मलिक बिकिनीमध्ये झळकणार असून तिच्या या अवतारातील चित्रीकरण बँकॉकमध्ये केले जाणार आहे.
या निमित्ताने वीणा मलिक सध्या साऊथमध्ये गेली असून या चित्रपटाच्या निमित्ताने काही गोष्टींचा सराव करणे आणि तिथल्या वातावरणाचा फील घेणे आदी कामे सुरू आहेत. आपण सिल्क स्मिताची भूमिका हुबेहूब वठवता यावी यासाठी भरपूर परिश्रम घेत आहोत असे तिने म्हटले आहे. या कन्नड रिमेकचे दिग्दर्शन त्रिशूल यांच्याकडे आहे आणि त्याचे चित्रीकरण गोवा आणि कर्नाटकात सुरू आहे.