बोधगया- बिहार येथील महाबोधी मंदिराच्या परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये तीन ते चार जण सहभागी असल्याचे, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (बुधवार) सांगितले. सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी यांनी स्फोटाच्या ठिकाणांना आज भेट दिली. यावेळी त्यांनी स्फोटात जखमी झालेल्या भिक्खूंचीही भेट घेतली.
बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणात 4 जणांचा सहभाग – सुशीलकुमार शिंदे
या स्फोटाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकार्यांशीही यावेळी गृहमंत्र्यांनी चर्चा केली. बोधगयातील स्फोटांविषयी गुप्तचर विभागाने पूर्वीच माहिती दिली होती. ही माहिती बिहार सरकारला 7 जुलैपूर्वीच सांगण्यात आली होती. पण, तरीही स्फोट झाले. त्यामुळे चूक नेमकी कोठे झाली, याची चौकशी करण्यात येईल,’ असे शिंदे म्हणाले.
या हल्ल्याबाबत बोलताना पुढे ते म्हणाले की, शांतीचे प्रतीक असलेल्या बुद्ध मंदिराच्या प्रांगणात हल्ला झाल्याने, हा चिंतेचा विषय बनला आहे. मंदिराच्या परिसरात 13 बॉम्ब ठेवण्यात आले होते. यातील दहा बॉम्बचा स्फोट झाला आहे. मध्यरात्री हे बॉम्ब ठेवण्यात आल्याची शक्यता आहे.’
स्फोटाबाबतच्या बॉम्बबाबत माहिती देताना शिंदेंनी सांगितले, की स्फोटांसाठी सिलेंडरचा वापरही करण्यात आला होता. सिलेंडरमध्ये खिळे आणि बॉल बिअरिंग होते. त्यांना डिटोनेटरच्या साहाय्याने कनेक्ट करण्यात आले होते आणि बरोबर घड्याळही लावण्यात आले होते. बिहार सरकारच्या मागणीमुळे तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. या स्फोटामध्ये माओवाद्यांच्या सहभागाबद्दलच्या शक्यतेचीही चौकशी करण्यात येणार आहे.’