पहिली फॅमिली सोलर कार तयार

जगातील पहिली सोलर पॉवरवर चालणारी फॅमिली कार नेदरलँडसमधील तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. ही कार केवळ सोलरवर चालते असे नाही तर ती जादा वीज तयार करू शकते. जगात यापूर्वी सोलर कार तयार केली गेली आहे मात्र ती एका माणसासाठीच उपयुकत होती. या विद्यार्थ्यांनी बनविलेली कार चार माणसांसाठी वापरता येणार आहे. –स्टेला- असे या जगातील पहिल्या फॅमिली कारचे नामकरण केले गेले आहे.

या कारवर बसविलेले सोलर सेल जादा क्षमतेचे आहेत. इलेक्ट्रिक कारला जेवढी वीज लागते त्यापेक्षा अधिक वीज हे सेल तयार करतात. त्यामुळे ही जादा वीज पॉवर ग्रीडला पुरविता येते. कार तयार करणार्‍या विद्यार्थी गटाने स्पष्ट केले की एरोडायनामिक्स डिझाईनची, अॅल्युमिनियम व कार्बनच्या उपयोगाने हलक्या वजनाची आणि इंधन बचत करणारी फॅमिली कार बनविणे हेच त्यांचे ध्येय होते. या कारचे स्टीअरिंग तुम्ही कार खूप वेगात चालवित असलात किवा खूप हळू चालवित असाल तर त्याप्रमाणे प्रसरण आकुंचन पावते. ही कार रस्त्यावर चालविण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्रही त्यांना मिळाले आहे.

विद्यापीठाच्या विविध सहा विभागातील २२ विद्यार्थी ही कार बनविण्यासाठी वर्षभर झटत होते असे समजते.