पोर्ट ऑफ स्पेन: टीम इंडियाने तिरंगी मालिकेत श्रीलंकेला पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेचा ८१ धावांनी धुव्वा उडवत श्रीलंकेविरुद्धच्या लढाईत टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने चार सामन्यांत दोन मोठ्या विजयांसह १० गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. फायनलमध्ये भारताची लढत श्रीलंकेशी होणार आहे. भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेची आघाडीची फळी कापून त्यावर विजयाचा कळस चढवला.
तिरंगी मालिकेत टीम इंडियाने श्रीलंकेचा ८१ धावांनी धुव्वा उडवत चार सामन्यांत दोन मोठ्या विजयांसह १० गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. श्रीलंका आणि वेस्ट इंडिजच्या खात्यात चार सामन्यातल्या दोन विजयांसह प्रत्येकी ९ गुणांची नोंद होती, पण सरस रन रेटच्या आधारावर श्रीलंकेने फायनल गाठण्यात यश मिळवले.
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात पहिली फलंदाजी करणा-या टीम इंडियाने २९ षटकांत ३ बाद ११९ धावांची मजल मारली होती. पण पावसाने हजेरील लावल्याने पाच तास खेळ थांबला. पावसाने अखेर एक्झीट घेतली तेव्हा मग श्रीलंकेसमोर विजयासाठी २६ षटकांत १७८ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. हे आव्हान घेऊन उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांना भुवनेश्वरने मात्र जोरदार धडक दिली. भुवनेश्वरने आपल्या दुस-याच षटकांतल्या पहिल्या चेंडूवर थरंगाचा अडथळा दूर केला. तर पाठोपाठ कुमार संगकाराला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले. त्यानंतर सातव्या षटकांत महेला जयवर्धनेला ११ तर नवव्या षटकात थिरिमन्नेला शुन्यावर बाद करत चौथा धक्का दिला. भुवनेश्वर कुमारने ६ षटकांत केवळ आठ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स काढल्या.