सराफ वळले सोन्याकडून हिर्‍यांकडे

मुंबई दि.९ – सरकारकडून सोने आयातीवर येत असलेले निर्बंध आणि आयात शुल्कात झालेली वाढ यामुळे देशातील नामवंत सराफ व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाचा रोख सोन्याकडून हिर्‍यांच्या दागिन्यांकडे वळविला आहे. टाटा तनिष्क आणि गीतांजली तसेच पीपी ज्युवेलर्स यासारख्या नामवंत कंपन्यांनीही हाच मार्ग अवलांबिला असल्याचे दिसून येत आहे.

गीतांजलीचे व्यवस्थापकीय संचालक मेहुल चोकसी या संदर्भात बोलताना म्हणाले की सोन्याच्या आयातीवर आलेली बंधने लक्षात घेऊन आणि हिर्‍यांची वाढती मागणी पाहून त्यांनी सोन्याचा कमी वापर असलेले हिर्‍यांचे दागिने प्रमोट करण्यास सुरवात केली आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातील अनिवासी भारतीयांना नजरेसमोर ठेवून ही पॉलिसी अमलात आणली जात आहे. लोअर कॅरेट दागिने आणि चांदीचे दागिने यावरही अधिक लक्ष दिले जात आहे.

भारतात सोन्याचे महत्त्व आगळेच आहे. लग्नसमारंभात वधूसाठी सोन्याचे दागिने अधिक महत्वाचे मानले जातात तसेच सोने खरेदी धार्मिक कारणांनीही केली जात असते. मात्र सरकारने आयातीवर निर्बंध लागू केल्यापासून सराफ व्यावसायिकांना अडचणी येत आहेत. त्यातच रूपयाची घरसण हातभार लावते आहे. अशा वेळी व्यवसायाची नवी क्षेत्रे शोधणे आवश्यक बनले आहे. चौदा कॅरेटचे दागिने बनविणे हा त्यावरचा पर्याय ठरू शकतो.

ऑल इंडिया जेम्स ज्युवेलर्स ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष हरेश सोनी यांच्या मते सोन्यात चांदी व तांबे मिकस करून हिर्‍यांच्या दागिन्यांत त्याचा वापर करण्यास प्राधान्य दिले जात आहे. यामुळे सरकारच्या आयात धोरणात आमचाही हातभार लागेल. असोसिएशनचे देशात ४० हजार सभासद आहेत. हिर्‍यांच्या दागिन्यात सोन्याचा वापर कमी करणे शक्य असते. त्यामुळे एखाद्या २२ कॅरेट दागिन्यासाठी जेवढे सोने लागते त्यापेक्षा २० ते २५ टक्के सोने अशा हिर्‍यांच्या दागिन्यात वाचते.

मध्यमवर्गीयांच्या कमाईत वाढ झाल्याने या वर्गाकडून हिर्‍यांसाठी मागणी चांगली आहे. त्यातही तरूण वर्ग सोन्याच्या दागिन्यांसाठी फारसा आग्रही नाही. मिडल इस्ट, युरोप, चीन, जपान या देशांतही बँडेड दागिने बनविणार्याी कंपन्या विक्री वाढीसाठी आपली दुकाने उघडण्यास प्राधान्य देत आहेत. गितांजली ब्रँडनेही या प्रकारे १८ महिन्यांच्या कालावधीत ५० टक्के विक्रीवाढ करण्याचे उदिष्ट ठेवले आहे.

Leave a Comment