संयमाची गरज

बिहारमधील बोधगयेच्या बोधीवृक्ष मंदिरात झालेल्या बॉम्बस्फोटामुळे खळबळ माजली खरी परंतु ती एक राष्ट्रीय आपत्ती आहेे ही जाणीव आपल्या नेत्यांपर्यंत पोहचलेली नाही हा नेहमीचा अनुभव याही वेळी आला. स्फोटाच्या घटनेतून आपला राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करू नये एवढा संयम नेत्यांना पाळता आला नाही. त्यामुळे एका बाजूला सारा देश आणि समाज चिंतेत असताना आपल्या देशातले काही ठराविक नेते त्यांना जडलेल्या खोडीनुसार या संकटाच्या प्रसंगीसुध्दा परस्परांवर आरोप करून आपला राजकीय हेतू साध्य करण्याच्या कामास लागले. नेते असे बेजबाबदारपणाने वागले तरी सामान्य जनता मात्र कौतुकास्पद संयमाने वागली. कोणत्या समाजघटकाच्या मानबिंदूवर असा घाला घातला गेला की त्या समाजघटकाच्या भावना प्रक्षुब्ध होतात आणि त्याला कोणाचे योग्य मार्गदर्शन नसेल तर अशा लोकांच्या प्रक्षुब्ध भावनांना वेड्या वाकड्या पध्दतीने तोंड फुटण्याची शक्यता असते. परंतु भारतातल्या बौध्द बांधवांनी बोधगयेच्या स्फोटांची प्रतिक्रिया अशी अनुचितपणे उमटू दिली नाही. अतीशय संयमित शब्दांमध्ये आणि मार्गांनी त्यांनी आपला संताप व्यक्त केला. अन्यथा देशात निदान काही ठिकाणी तरी हिंसक घटना घडू शकल्या असत्या.

किंबहुना अशा मानबिंदूवर हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांचा अशा घटनेमागचा हेतू हाच असतो. लोक चिडावेत त्यांनी आपली प्रतिक्रिया हिंसक मार्गांनी व्यक्त करावी आणि तशी ती केली की तिला समाजाच्या दुसर्‍या घटकाकडून तसेच उत्तर मिळावे, एकंदरीत समाजामध्ये जाती जातीत आणि धर्मा धर्मांत वैराची भावना पसरावी हाच त्यांचा उद्देश असतो. देशामध्ये असे काही प्रकार घडले की जे लोक संतप्त होतात आणि हिंसक प्रतिक्रिया नोंदवतात ते लोक दहशतवाद्यांचा हेतूच पूर्ण करत असतात. परंतु परिपक्व बुध्दीचे लोक संयमाने आपली प्रतिक्रिया नोंदवतात आणि अहिंसक मार्गाने आपला संताप व्यक्त करतात. अशी संयमित प्रतिक्रिया दहशतावाद्यांच्या हेतूला शह देणारी असते आणि त्यांना खरे चोख उत्तर देणारी असते. दहशतवादी संघटना अधूनमधून धार्मिक स्थळांना याच हेतूने लक्ष्य करत असतात. पण आजवर तरी भारतामध्ये त्यांचा हा हेतू सफल झालेला नाही. त्यांनी आजवर अनेक मशिदी आणि मंदिरांना लक्ष्य केले परंतु त्यातलया कोणत्याही प्रसंगात भारतात हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्या नाहीत. या दोन्ही समाजांना अतिरेक्यांचा हेतू समजलेला आहे.

आजही बौध्द बांधवांनी याच समजूतदारपणाचा प्रत्यय आणून दिला आहे. या पुढच्या काळातही असाच संयम दाखवला जाईल आणि सर्व समाजघटक शांततेने राहतील अशी अपेक्षा आहे. बोधगयेतला हा प्रकार नेमका कोणी घडवला आहे. याचा अजून निश्‍चित शोध लागलेला नाही. काही संशयितांकडे संशयाची सूई वळत आहे परंतु अजून तरी निश्‍चित स्वरूपाचा निष्कर्ष काढता येईल असे पक्के धागेदोरे मिळालेले नाहीत. त्यामुळे या घटनेच्या संबंधात कोणीही कसलीही टीकाटिप्पणी करून कोणाला तरी संशयित जाहीर करणे हे अपरिपक्वतेचे लक्षण ठरणार आहे. अर्थात ही गोष्ट माहीत असूनसुध्दा नेहमीप्रमाणेच काही राजकीय नेत्यांनी या घटनेचे खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न सुरू केला आहे. मागे एकदा मुंबईत स्फोट झाले तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी अनुचित प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. राहुल गांधी, आर. आर. पाटील, शिवराज पाटील, विलासराव देशमुख अशा सार्‍यांनी, त्यांना घटनेचे गांभीर्य कळलेले नाही याचे दर्शन घडवत अतीशय विपरीत अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. दिग्विजय सिंग हे या बाबतीत हाताच्या बाहेर गेलेले प्रकरण आहे. त्यांच्या प्रतिक्रिया फार गांभिर्याने घेतल्या जात नाहीत.

कोणत्याही घटनेची जबाबदारी नरेंद्र मोदीवर टाकून सर्वांची करमणूक करण्याचा वसा दिग्विजय सिंग यांनी घेतला आहे. मात्र अशी घातपाती घटना घडल्यानंतर माकडचेष्टा करून घटनेचे गांभीर्य घालवता कामा नये एवढेही तारतम्य दिग्विजय सिंग यांच्यात राहिलेले नाही. एक मनोविकृती जडलेला परंतु कॉंग्रेसच्या नेत्यांनी डोक्यावर चढवलेला अर्धवट वेडा माणूस या पलीकडे त्यांना काही किंमत असता कामा नये. परंतु किंमत दिली जात आहे आणि दिग्विजय सिंगसुध्दा दुःखाच्या प्रसंगी हास्य निर्माण करण्याचा आपला वसा सोडायला तयार नाहीत. तसा तो सोडला असता तर त्यांनी काल बोधगयेतील स्फोट आणि नरेंद्र मोदी यांचे भाषण यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्नच केला नसता. त्यांची प्रतिक्रिया एक अविचार म्हणून आपण सोडून देऊ परंतु स्वतःला विचारी समजणार्‍या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सुध्दा तारतम्य सोडून बोलावे याचे सखेद आश्‍चर्य वाटते. एखाद्या ठिकाणी स्फोट होणार नाही याची खात्री देणार कोण असा सवाल त्यांनी केला. जर सत्ताधारी पक्षाचा नेताच स्फोट होणार नाही याची खात्री देणार नसेल तर राज्यातली जनता निर्धास्तपणे झोपसुध्दा घेऊ शकणार नाही. हे नितीशकुमार विसरलेले दिसतात. भारतीय जनता पार्टीचे नेते राजनाथसिंह यांनी सीबीआय आणि अन्य गुप्तचर संघटनांचा वापर सत्ताधारी पक्षाच्या खाजगी कामांसाठी होत असल्यामुळे स्फोट होत आहेत. अशी प्रतिक्रिया नोंदवली. अशा सार्‍या प्रकारातून आपल्या देशातल्या राजकीय नेत्यांचा पोरकटपणाच दिसून येत आहे. खरे म्हणजे या स्फोटांच्या बाबतीत गुप्तचर यंत्रणा कोठेही कमी पडलेल्या नव्हत्या. त्यांनी राज्य सरकारला स्फोट होऊ शकतो असा इशारा दिलेला होता. अशा प्रसंगात गुप्तचर यंत्रणांना दोषी ठरवणारे विधान करणे हा प्रकार स्फोटात राजकारण आणण्याचा प्रकार ठरतो. संकटाच्या प्रसंगात तारतम्याने वागावे हे आपल्या नेत्यांना कधी समजणार आहे?