महाविद्यालय परिसरात मोबाइल जॅमर नाही

मुंबई, दि.9 – महाविद्यालय परिसरात मोबाइल जॅमर बसवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्टीकरण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारची गदा आणली जाणार नसल्याचेही टोपे यांनी सांगितले आहे. महाविद्यालय परिसरात मोबाइल जॅमर बसवण्याची मागणी, औरंगाबादमधील एका राष्ट्रवादी कार्यकर्त्याने पत्राद्वारे केली आहे.

राज्यातील सायबर क्राईम वाढत आहेत. महाविद्यालयात तरुणींचे अश्‍लील छायाचित्रे काढली जातात, मोबाइलचा परीक्षेत दुरुपयोग होतो, अशी कारणे सांगत, अशा बंदीची मागणी औरंगाबादचे अशोक लाड यांनी केली आहे. काही गैरप्रकार मोबाइलमुळे घडत आहेत. पण अशा प्रवृत्तींना रोखण्याऐवजी सरकार थेट तंत्रज्ञानाला खलनायक ठरवू पाहात आहे, अशी भावना निर्माण झाली. त्यामुळे विद्यार्थीवर्गातून त्याला विरोध होत आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही महाविद्यालय परिसरात मोबाइल जॅमर बसवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता राजेश टोपे यांनीही तसा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.

मोबाइल जॅमर म्हणजे नेमके काय?

मोबाइल फोनला मिळणारे सिग्नल रोखणारी यंत्रणा म्हणजे मोबाइल जॅमर होय. जॅमर लावल्यामुळे मोबाइलला सिग्नल मिळत नाहीत. त्यामुळे फोन येणे-जाणे बंद होते. भारतात मोबाइल जॅमर हे वैध आहे. सरकारी कार्यालये, धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था इत्यादी ठिकाणी मोबाइल जॅमर लावले जातात. मोबाइल जॅमर हा कोणत्याही ठिकाणी लावता येतो. पण सायलेन्स झोन क्षेत्रात मोबाइल जॅमरची वाढती मागणी असते. गोपनीय माहिती, सुरक्षा आदी कारणासाठीही जॅमर लावण्यात येतात. भारतात मोबाइल जॅमर वैध आहे. मात्र, बहुसंख्य देशात हे अवैध आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी यासारख्या देशांचा समावेश आहे.

 

Leave a Comment