नवी दिल्ली – आयबीच्या इशार्यानंतरही बोधगयातील दहशतवादी हल्ले रोखू न शकल्यामुळे विरोधकांचे लक्ष्य ठरलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विरोधकांवरच पलटवार केला. ’सत्तेसाठी हापापले लोक आपल्यावर बेताल आरोप करत आहेत. मात्र, कुणी कितीही म्हटले तरी बॉम्बस्फोट होणारच नाहीत असा दावा कुठलेही सरकार करू शकत नाही,’ अशी हतबलता नितीश यांनी व्यक्त केली.
बोधगयातील बॉम्बस्फोटांनंतर विरोधकांनी नितीश कुमार यांच्या सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर नितीश यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली. ’बोधगयातील स्फोटांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कोणतेही मत व्यक्त करणे योग्य होणार नाही. महाबोधी मंदिराची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे द्यायला हवी. बिहार सरकार या सुरक्षेचा खर्च उचलायला तयार आहे,’ असे नितीश यांनी सांगितले.
नितीश यांनी यावेळी आपल्या विरोधकांवर टीका केली. ’महाबोधी मंदिरातील बॉम्बस्फोटांसाठी विरोधक आमच्या सरकारला जबाबदार धरत आहेत. पण कुठलेही
सरकार असे बॉम्बस्फोट थांबवू शकत नाही. सरकार फारतर सुरक्षेचे चांगले उपाय योजू शकते,’ असे नितीश म्हणाले.
बोधगयातील महाबोधी मंदिराच्या आवारात 9 स्फोट झाल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. परंतु, गृहमंत्रालयाला मिळालेल्या माहितीनुसार मंदिराच्या आवारात तब्बल 13 बॉम्ब पेरण्यात आले होते. त्यापैकी 10 बॉम्बचे स्फोट झाले होते. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज ही माहिती दिली.