वॉशिंग्टन दि.९ – अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थेचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याने गार्डीयन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार नॅशनल सिक्युरिटी संस्थेला गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल यासारख्या महत्त्वाच्या कंपन्यांनी आपल्या कडील डेटा पाहण्यासाठी थेट अॅक्सिस दिला होता. यामुळे युजरला आलेल्या वाढदिवसांच्या शुभेच्छांपासून ते तुमची माहिती साठविण्यासाठी ज्या ज्या मेथड युजर वापरत होता ती सर्व माहिती या संस्थेला सहज उपलब्ध होत होती.
स्नोडेनच्या मते या कंपन्यांनी एकत्र येऊन राष्ट्रीय सुरक्षा संस्थेला सहकार्याचा हात पुढे केला होता. त्यांनी आपले सर्व्हर दिले नसले तरी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेला माहितीसाठी थेट अॅक्सिसच दिला होता. त्यामुळे कंपन्यांवर माहिती पुरविल्याची जबाबदारी येणार नव्हती. मात्र त्यामुळे युजरच्या वैयक्तीक माहिती बरोबरच क्लाऊड मध्ये साठविलेली माहिती आणि युजरचे सर्व रेकॉर्डच त्यांना तपासणे शक्य होत होते. वाढदिवसाच्या शुभेच्छांसह सर्वच कम्युनिकेशनवर त्यामुळे ही संस्था नजर ठेवून होती.
स्नोडेन सध्या मास्को विमानतळावर ट्रांझिट झोनमध्येच असून त्याला व्हेनेझुएला, निकारग्वे आणि बोलिव्हीया या देशांनी आश्रय देण्याची तयारी दर्शविली आहे.