भारतीय चित्रपटातून समाजाचे प्रतिबिंब-फ्रेन्च निर्माती क्लेयर डेनिस

पुणे, दि. 8 -चित्रपट, संगीत आणि चित्रांमधूनच मला भारताची ओळख झाली. सर्वाधिक ओळख चित्रपटातून झाली. त्यात समाजाचे प्रतिबिंब पहायला मिळते. या देशात अध्यात्मिक विचार केवळ हिंसक धार्मिक वादातूनच समोर येत नाहीत, हे प्रकर्षाने जाणवते. ही बाब अन्य देशापेक्षा वेगळी आहे, असे मत फ्रेन्च चित्रपट निर्माती-दिग्दर्शिका क्लेयर डेनिस यांनी व्यक्त केले.

फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथील विद्यार्थ्यांना डेनिस यांनी चित्रपट निर्मितीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अन्य देशांच्या तुलनेत फ्रान्समध्ये चित्रपट कमी खर्चात बनतात. तेथे चित्रपटांसाठी फारशी पूरक साधन सामुग्रीही नाही. मी फार लवकर चित्रीकरण संपवते म्हणून प्रसिद्धही आहे. याचे खरे कारण खर्चाच्या अंदाजाचे आहे. परंतु, मी संपादनावर खूप वेळ घालवते. प्रत्येक प्रसंग एका अर्थी आपलाच असतो, पण तो कापावा लागतो तेव्हा खूप वाईट वाटते, असेही डेनिस यांनी सांगितले. चित्रपटाचे शीर्षक उत्कंठावर्धक असावे. त्यावरून चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढायला हवी. चित्रपटाचा अर्क त्या चित्रपटाच्या शीर्षकात असायला हवा, भारतात व्यावसायिक आणि आर्ट फिल्म असे दोन प्रकार आहेत. परंतु, फ्रन्समध्ये यात पुसटशी सीमा रेषा आहे. व्यावसायिक चित्रपट भारतासारखे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment