चित्रगंदाचे प्राणिप्रेम

कलात्मक व व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या चित्रपटांत छाप सोडणारी बॉलीवूडची डस्की ब्युटी चित्रगंदा सिंहची अभिनयक्षमता सगळय़ांनाच माहीत असेल, पण पडद्यावर शानदार अभिनय करणारी चित्रगंदा प्राणिप्रेमीही आहे. प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी चित्रगंदाने एक मोहीम उघडली आहे.

आजकाल विविध सौंदर्यप्रसाधने आणि चामडी बॅग बनविण्यासाठी प्राण्यांचा वापर केला जातो. भारतात खरेतर अशा प्रकारांवर प्रतिबंध आहे, तरीही अनेक ठिकाणी प्राण्यांची कत्तल करून त्यांचा यासाठी वापर केला जातो. या अमानुष प्रकारांना आळा घालण्यासाठी चित्रगंदाने हल्लीच एका जाहिरातीचे चित्रण केले आहे. आपल्या या उपक्रमाबाबत चित्रगंदा सांगते की, प्राण्यांचा वापर रोखण्यासाठी अन्य नट्यांप्रमाणे विवस्त्र फोटोशूट करण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणूनच या जाहिरातीसाठी तिनेच निर्मात्याला कल्पना दिली. या जाहिरातीमध्ये एक सुईची तिच्या डोळय़ांत चाचणी घेताना दाखविले जाणार आहे. यातून आपण प्राण्यांवर ज्या प्रकारच्या चाचण्या करतो तशाच एलियनने आपल्यावर केल्या तर काय होईल, असा संदेश देण्याचा प्रयत्न आहे.

प्राण्यांवर चाचणी करतेवळी नाना प्रकारचे अत्याचार केले जातात. त्यामुळे मी ज्यामध्ये प्राण्यांचा कोणत्याही प्रकारे वापर करण्यात आलेला नाही असेच कपडे व सौंदर्यप्रसाधने वापरते. अशा वस्तू खरेदी करण्यापेक्षा मी त्यांचा वापर न करण्यालाच प्राधान्य देते, असे चित्रगंदाने सांगितले. चित्रगंदाच्या या जाहिरातीचे लवकरच चित्रण केले जाणार आहे.

Leave a Comment