शनैरासोबत अक्रम करणार विवाह

मेलबर्न, दि.8 – ऑस्ट्रेलियन ब्युटी शनैरा थॉमसनने टाकलेल्या सौंदर्याच्या यॉर्करवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम क्लिन बोल्ड झाला आहे. अक्रम लवकरच शनैराशी विवाह करणार असल्याने अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्याबरोबर असलेल्या अफेरची चर्चा ही निव्वळ चर्चाच ठरणार आहे.

शनैरा थॉमसन या 30 वर्षीय ऑस्ट्रेलियन ब्युटीच्या अदांवर घायाळ होत 47 वर्षीय अक्रमने अतिशय रोमँटिक अंदाजात तिला प्रपोज केले. आपल्या जीवनातील हा अत्यंत रोमँटिक क्षण होता, असे अक्रमच्या प्रपोजलनंतर शनैराने सांगितले. अक्रमचे आपल्यावर असलेले प्रेम हृदयापासून आहे आणि त्यात कुठलाही दिखावा नाही, असे शनैरा म्हणाली. तर आपण पुन्हा प्रेमात पडू असे कधी वाटले नव्हते, असे शनैराच्या प्रेमात पडलेला अक्रम म्हणाला.

अक्रम आणि शनैरा हे 2011 मध्ये मेलबर्नला पहिल्यांदा भेटले होते. शनैरा ही पब्लिक कन्सलटंट आहे. लग्नानंतर ती मुस्लिम धर्म स्वीकारणार आहे. अक्रमच्या पहिल्या पत्नीचे 2009 मध्ये निधन झाले आहे. तिच्यापासून त्याला दोन मुलेही आहेत.