पृथ्वीला होते दोन चंद्र ?

खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीचा सध्या आपण पाहात असलेला चंद्र हा पृथ्वीपासून वेगळा झालेला नसावा असा दावा केला आहे. प्रोफेसर एरिक असफाग या युनि. ऑफ कॅलिफोर्नियातील प्राध्यापकांनी आपली नवी थेअरी मांडण्याची तयारी चालविली असून रॉयल सोसायटीत सप्टेंबरमध्ये होत असलेल्या परिषदेत ते ही थेअरी मांडणार आहेत.

एरिक यांच्या मते लक्षावधी वर्षांपूर्वी पृथ्वीला दोन जुळे चंद्र असावेत. दुसरा चंद्र लहान आकाराचा मात्र पृथ्वीच्या कक्षेत फिरणाराच होता. कालांतराने या दोन चंद्रात धडक झाली आणि त्यातून सध्याचा चंद्र उदयास आला असावा. कारण आत्ता आपण पाहतो त्या चंद्राचे लँडस्केप अभ्यासले तर तेथेही पर्वत आहेत आणि तेथे या धडकेत लुप्त झालेल्या छोट्या चंद्राचे कांही अवशेषही आहेत. हा छोटा चंद्र सध्याच्या चंद्राच्या १/१३ इतक्या आकाराचा असावा असेही एरिक यांचे म्हणणे आहे.

पृथ्वीच्या चंद्राची निर्मिती ३० दशलक्ष वर्षांपूर्वी झाली असावी आणि सौर मंडळ निर्मिती होण्यास १३० दशलक्ष वर्षांच्या कालावधी लागला असावा असेही संशोधनात आढळले आहे. इतकेच नव्हे तर या सौरमंडळ निर्मितीच्या वेळी पृथ्वीसारख्याच ९ सुपर अर्थ निर्माण झाल्या असाव्यात असाही एरिक यांचा दावा आहे. त्यांच्या मते असे पृथ्वीच्या १ ते १० पट मोठे ग्रह पूर्वीच आढळले आहेत.

हॉवर्ड येथील शास्त्रज्ञांनी गतवर्षी चंद्र हा पृथ्वीचाच भाग असावा व अन्य कोणत्यातरी बॉडीशी पृथ्वीची टक्कर होऊन चंद्राची निर्मिती झाली असली पाहिजे असे मत व्यक्त केले होते. खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेत पृथ्वीसारखे किमान १०० अब्ज ग्रह असावेत असाही दावा केला आहे.