पाकिस्तानात मृत्यूदंडावरील बंदी उठविली

इस्लामाबाद दि. ८ – पाकिस्तानात नव्याने सत्तेवर आलेल्या नवाझ शरीफ यांच्या पक्षाने देशात मृत्यूदंडावर अगोदरच्या सरकारने घातलेली बंदी उठविली आहे. सरकारच्या या निर्णयावर अम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवी हक्क संरक्षण संस्थेने आश्वर्च व्यक्त केले आहे.

पाकिस्तानचे इंटेरियर मिनिस्ट्री प्रवक्ते ओमर हमीद खान या संदर्भात माहिती देताना म्हणाले की पाकिस्तानातील पूर्वीच्या सरकारने जून २००८ मध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी आणली होती. मात्र  पाकिस्तानातील वाढती गुन्हेगारी आणि दहशतवाद यांना पायबंद घालण्यासाठी कडक शिक्षेची आवश्यकता होती.यामुळे शरीफ सरकारने नवीन पॉलिसी ठरवून मृत्यूदंडावरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानात सध्या मृत्यूदंडाची शिक्षा झालेले ४०० जण असून या सर्वांची शिक्षा अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अफगाणिस्तान सीमा तसेच कराची भागात तालिबानी दररोज हल्ले करत आहेत. मृत्युदंडावर बंदी आणल्यापासून राष्ट्रपतींकडे दररोज किमान १२ अर्ज दयेसाठी येत आहेत असेही ओमर यांनी सांगितले. मानवी हक्क संघटनांचा मृत्यूदंडाला विरोध असून जगातील किमान १५० देशात ही शिक्षा रद्द केली गेली आहे अथवा तिची अम्मलबजावणी थांबविली गेली आहे. यामध्ये निरपराध माणसालाही फुकटच जीव गमवावा लागण्याची भीती असते म्हणून ही शिक्षा दिली जाऊ नये असे मानवी संघटनांचे म्हणणे आहे.

जगभरातील डझनावारी देशांत मृत्यूदंडाची शिक्षा झालेले ८ हजारांपेक्षा अधिक गुन्हेगार आहेत.

Leave a Comment