अजित पवारांना धक्का

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे, अजित पवार यांच्या शेरेबाजीमुळे सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. परंतु या निवडणुकीत अजित पवार यांची शेरेबाजी आणि आपल्याच मित्रपक्षाच्या नेत्यावर केलेले गंभीर स्वरूपाचे आरोप हे त्यांच्या अंगलट आले आहेत आणि या महापालिकेची सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अश्‍वमेधाचा घोडा मोठ्या वेगाने पळत असल्याचा आभास या पक्षाचे नेते नेहमीच निर्माण करत असतात. पण त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. सांगलीच्या जनतेने त्यांना नाकारले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षाच्या नावात राष्ट्रवादी हा शब्द असला तरी महाराष्ट्राच्या बाहेर या पक्षाला फारसे स्थान नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सुध्दा सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नाशिक, नगर या पश्‍चिम महाराष्ट्रात मोठे स्थान आहे. पण याच परिसरातल्या एका महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा केवळ पराभवच झाला आहे असे नाही तर हातात असलेली सत्ता याच पक्षाच्या राज्य पातळीवरील आघाडातल्या मित्रपक्षाने हिसकावून घेतली आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळातले जबाबदार मंत्री या निवडणूक प्रचार मोहिमेत उतरले होते. सर्वश्री अजित पवार, पतंगराव कदम, मदन पाटील, जयंत पाटील, आर.आर. पाटील आदी नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पक्षाचा कार्यक्रम आणि योजना यावर प्रचारात भर देण्याऐवजी त्यांनी परस्परांवर चिखलफेक सुरू केली होती. त्यातल्या त्यात अजित पवार यांनी कसल्याच मर्यादा ठेवायच्या नाहीत असे ठरविल होते. खरे म्हणजे अवास्तव, अवाजवी आणि असभ्य बोलण्यामुळे अजित पवार अनेकवेळा अडचणीत आलेले आहेत. परंतु तरीसुध्दा त्यांची असे बोलण्याची खोड जात नाही असे या निवडणुकीच्या प्रचारात प्रकर्षाने जाणवले. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी कोणी किती भ्रष्टाचार केलेला आहे आणि कोणी किती जमिनी लाटलेल्या आहेत याचे हिशोब जाहीर सभांतून मांडले. या आरोप प्रत्यारोपामुळे आणि त्यांचे विविध वृत्तवाहिन्यांवरून थेट प्रसारण झाल्यामुळे या निवडणुकीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिचा निकालसुध्दा धक्कादायक लागला असून राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे.

ही महानगरपालिका याच पक्षाच्या हातात रहावी अशी त्या जिल्ह्यातले नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांची धडपड होती. कारण त्यांचे राजकारणातले स्थान या महानगरपालिकेच्या निवडणूक निकालावर अवलंबून आहे. या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागलेले दुसरे नेते म्हणजे आर.आर. पाटील. तेही एकेकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. आता गृहमंत्री आहेत. पृथ्वीराज चव्हाण, माणिकाराव ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांना आपला जिल्हा, आपले गाव ताब्यात ठेवता येत नाही असे टोमणे अजित पवार सतत मारत असतात. पण आता राष्ट्रवादीच्या आर.आर. पाटील आणि जयंत पाटील यांना आपले गाव ताब्यात ठेवता आलेले नाही. या निवडणूक प्रचारातील भाषणांची पातळी घसरली असे सरसकट बोलले जात असले तरी कॉंगे्रसच्या नेत्यांनी ही पातळी सांभाळली होती आणि अजित पवार यांनी ती घसरवली असे तुलनात्मकदृष्ट्या म्हणता येते. त्यांनी पतंगराव कदम, नारायण राणे यांच्यावर केलेले आरोप खरे आहेत परंतु ते आरोप करतानाची भाषा ही अरेरावीची आणि असभ्यतेची होती. पतंगराव कदम यांनी सरकारी जमिनी हडप केल्याच असतील तर केवळ जाहीर सभेत असा आरोप करून थांबून चालणार नाही.

राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आता या जमिनीचा सारा हिशोब आर. आर. पाटील यांना दिला पाहिजे आणि आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री म्हणून या जमिनीचे व्यवहार तपासले पाहिजेत. या उलट कॉंग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केलेले आहेत. त्यांनीसुध्दा आरोप करून थांबून चालणार नाही. कारण कॉंग्रेससुध्दा सत्ताधारी पक्ष आहे आणि राज्यातला भ्रष्टाचार जाहीर सभेतून केवळ मांडण्यापेक्षा त्यांनीसुध्दा आता अजित पवार यांच्या भूखंडांवर कारवाईचा बुलडोझर चालवला पाहिजे. परंतु दोन्हीही पक्षाचे नेते परस्परांवर असे आरोप करून नंतर गळ्यात गळे घालणार असतील तर ती जनतेची प्रचंड मोठी फसवणूक ठरणार आहे. या प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर सांगली- मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीतील मतदारांनी राष्ट्रवादीला चांगलाच धडा शिकवला आहे आणि त्यांच्या हातून सत्ता हिसकावून घेऊन ती कॉंग्रेसच्या हातात दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. हातात असलेली सत्ता गमवावी लागणे ही त्यांच्यासाठी नामुष्कीची गोष्ट झाली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतण्याला राष्ट्रवादीत आणून अजित पवार यांनी मोठी शिकार केल्याचा आव आणला होता आणि आता महाराष्ट्रात राष्ट्रवादीची जोरदार घोडदौड सुरू आहे असा भास निर्माण केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते किती शेखी मिरवत असले तरी त्यांचे खरे स्थान पश्‍चिम महाराष्ट्रात आहे आणि याच भागात त्यांना मोठा धक्का बसला आहे. यानंतर तरी अजित पवारांचे पाय जमिनीला लागतील अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment