पुणे माझे घर आहे – ऐश्‍वर्या राय बच्चन

पुणे, दि. 7 (प्रतिनिधी) – पुण्याची सांस्कृतिक शहर म्हणून असलेली ओळख मी जवळून अनुभवली आहे. पुण्याशी शहराशी माझे अतूट नाते आहे. कारण माझ्या दोन मावशी याच शहरात राहतात. त्यामुळे पुणे माझे घरच आहे, अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्‍वर्या राय बच्चन हिने रविवारी व्य्नत केली. दागिन्यांतील किरकोळ विक्रीतील अग्रगण्य कल्याण ज्वेलर्सचे तीन मजली भव्य शोरूम कर्वे रोड येथे सुरू करण्यात आले. हे शोरूम कल्याण ज्वेलर्सचे 50 वे शोरूम आहे. या शोरूमचे उद्घाटन ऐश्‍वर्याच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ती बोलत होती. यावेळी कल्याण ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस. कल्याणरमण, राजेश कल्याणरमण, रमेश कल्याणरमण उपस्थित होते.

ऐश्‍वर्या म्हणाली, सिंप्लीसिटीवर माझा विश्‍वास आहे. त्यामुळे मला अगदी कमी आणि साधे दागिने घालायला आवडतात. माझी वेडिंग रिंग आणि आई व सासूला आवडणार्‍या मंगलोरी आणि बेंगाली बांगड्या सर्वाधिक आवडतात. तुला आराध्याच्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, यावर भाष्य करताना ऐश्‍वर्या म्हणाली, सध्या ती खूप लहान आहे. त्यामुळे तिच्या आवडी-निवडीवर बोलणे उचित ठरणार नाही. संजय लीला भन्साळी आणि करण जोहरकडून चित्रपटाविषयी विचारणा झाली आहे. तर कमबॅक कधी करणार यावर तिने सांगितले की मी बॉलिवुड सोडून कुठेही गेलेले नाही. मी फक्त ब्रेक घेतला आहे; यामुळे कमबॅक असे म्हणता येणार नाही. ऑफर स्वीकारल्या किंवा नाही, यावर बोलण्यास तिने नकार दिला.
———————————-