सेक्युलॅरिझम नेमका आहे काय ?

सेक्युलॅरिझम नेमका काय आहे ? यावर कोणीही एका आवाजात बोलत नाही. प्रत्येकाची सेक्युलॅरिझमची व्याख्या वेगळी असते. म्हणून असे म्हटले जाते की, सेक्युलॅरिझम ही एक टोपी आहे. ती ज्याच्या डोक्याला घालाल त्या डोक्याला फिट बसते. डोके किती का मोेठे असेना पण ती टोपी सर्व डोक्यांवर फिट बसत असते. अशी ही संदिग्ध संकल्पना असल्यामुळे तिच्याबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. केन्द्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत, भाजपाने आपला जातीयवादी कार्यक्रम पुढे केला असल्याचे आणि हा कार्यक्रम सेक्युलॅरिझमशी विसंगत असल्याचे म्हटले. भाजपाचा हा कार्यक्रम १. राम मंदिर २. समान नागरी कायद्याची मागणी आणि ३. घटनेचे ३७० वे कलम रद्द करण्याची मागणी असा त्रिसूत्री आहे. ही तीन कलमे भाजपाने पुढे केली आहेत पण ती सेेक्युलॅरिझमशी विसंगत आहेत का ? याचा नीट विचार केला पाहिजे. हा देश सेक्युलर असल्याचे नेहमी म्हटले जाते पण या देशात सर्वाधिक कुचेष्टा सेक्युलॅरिझम्चीच केली जाते. सेक्युलॅरिझम् म्हणजे नेमके काय हे सांगण्याच्या भानगडीतही कोणी पडत नाही.

आपल्या राजकारणामध्ये किंवा प्रशासनामध्ये कोणतेही निर्णय घेताना धर्म हा निकष किंवा आधार असता कामा नये असे सेक्युलॅरिझम्मध्ये मानले जाते. किंबहुना बड्या मोठ्या नेत्यांनी आपल्याला वारंवार असेच सांगितलेले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे सेक्युलर नेते होते. ते निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी मंदिर, मठ, गुरुद्वारा किंवा मस्जीद अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अजीबात जात नसत. निवडणुकीचा धर्माशी काय संबंध, असा त्यांचा रास्त प्रश्‍न असे. इंदिरा गांधी या पंतप्रधान झाल्या. त्यांनी या गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आणि त्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ धार्मिक स्थळांपासून करायला लागल्या. तरीही त्या स्वत:ला सेक्युलरच म्हणवून घेत होत्या आणि त्यांचे अनुयायी त्यांना सेक्युलर म्हणत होते. अशा प्रकारे मुळातच संदिग्ध असलेली एक संकल्पना आणि नेत्यांचे वर्तन यामध्ये विसंगती दिसायला लागली की, लोकांच्या मनात सुद्धा या संकल्पनेविषयी बरेच गैरसमज निर्माण होतात आणि गोंधळ निर्माण होतो. भारतीय लोकांच्या मनावर धर्माचा मोठा पगडा आहे. त्यामुळे ते पदोपदी धर्म, देव, मठ, मस्जिद यांचे संदर्भ घेत असतात. त्यामुळे तर सरकार आणि धर्म, प्रशासन आणि जात यातली सीमारेषा निश्‍चित करणे अवघड होऊन बसले आहे.

भाजपाचे नेते एका बाजूला हिंदू राष्ट्राची घोषणा करून दुसर्‍या बाजूला आपण खरे सेक्युलर आहोत असा दावा करून मोठी वैचारिक कसरत करत असतात. पण बाकीच्या पक्षांना भाजपाला धर्मवादी ठरवले की स्वत:ला सेक्युलर म्हणवण्याची सोय होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी जे काही म्हणेल ते म्हणजे जातीयवादी. असे समीकरण त्यांनी रूढ केले आहे. भाजपाचा कार्यक्रम म्हणजे जातीयवादी कार्यक्रम. भाजपाची धोरणे म्हणजे सेक्युलरविरोधी धोरणे असे त्यांच्या सांगण्याने लोकांच्या मनावरही चांगले ठसले आहे. मात्र त्यामध्ये काही तरी गडबड आहे हे लोकांच्या लक्षातच येत नाही. भारतीय जनता पार्टीचा सर्वात मोठा जातीयवादी कार्यक्रम म्हणजे राम मंदिर. अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या कल्पनेचा पाठपुरावा भाजपाने सातत्याने केलेला आहे आणि या पक्षाचा तो कार्यक्रम जातीयवादी आहे हे नि:संशय आहे. भाजपाच्या या तीन कलमांतला पहिला कार्यक्रम सेक्युलॅरिझम्शी विसंगत आहे ही गोष्ट मान्यच करावी लागेल. पण समान नागरी कायदा आणि घटनेचे ३७० वे कलम याही दोन कार्यक्रमांची वासलात भाजपाचा जातीयवादी कार्यक्रम म्हणून लावली जाते. यातली विसंगती कोणाच्याच लक्षात येत नाही. समान नागरी कायदा म्हणजे काय?

देशातल्या सर्व लोकांना त्याची जात, धर्म यांचा विचार न करता कायदा लागू करावा. आपल्या देशात मुस्लिमांसाठी वेगळा नागरी कायदा आहे. जगाच्या पाठीवर काही अपवाद वगळता कोठेही अशी स्थिती नाही. एकदा एखादा कायदा केला की तो सर्वांना लागू होतो. मग तो कोणत्याही धर्माचा असो आणि हाच तर सेक्युलॅरिझम् आहे. मग भारतीय जनता पार्टीने भारतात सर्वांना समान नागरी कायदा असावा ही मागणी केली तर तो जातीयवाद ठरेल की सेक्युलरवाद ठरेल? आपला देश जर खरा सेक्युलर असेल तर देशाने सर्वांना एकच कायदा केला पाहिजे. धर्माच्या आधारावर वेगळा कायदा असता कामा नये. पण आपण तसा कायदा केलेला आहे आणि तरीही स्वत:ला सेक्युलर म्हणून घेत आहोत आणि तसा कायदा असावा, अशी मागणी करणार्‍या भाजपाला जातीयवादी ठरवत आहोत. तीच गोष्ट ३७० व्या कलमाला लागू आहे. ते कलम रद्द करावे ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक बाब आहे. पण ती मागणी करणार्‍या भाजपाला आपण जातीयवादी म्हणत आहोत. या ठिकाणी भाजपाची तरफदारी करण्याचा हेतू नाही, परंतु आपण सेक्युलॅरिझम्च्या बाबतीत नेमकेपणे भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगावे ही भूमिका आहे.

Leave a Comment