सांगलीच्या महापालिका निवडणुकीत मतदान झाले. या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे दोन पक्ष परस्परांच्या विरोधात होते. त्यामुळे त्यांनी परस्परांवर आरोपांची आणि प्रत्यारोेपांची राळ उडवली. आता निवडणूक संपली आहे. या दोन पक्षांचे नेते मंत्रिमंडळाच्या बैठकीत समोरासमोर आणि मांडीला मांडी लावून बसतील मात्र दोन तीन दिवसांपूर्वीच आपण एकमेकांना चोर, भ्रष्ट म्हटले होते याची कसलीही निशाणी त्यांच्या बोलण्यात तर दिसणार नाहीच पण त्यांच्या चेहर्यावरही दिसणार नाही. त्यांनी परस्परांवर केलेेले आरोप आता त्यांच्या लक्षातही नसतील पण ते आरोप इतके गंभीर स्वरूपाचे आहेत की लोक त्यांना आता विसरणार नाहीत. या प्रचारात अजितदादांनी पतंगराव कदम यांच्यावर सरकारी जमिनी हडप केल्याचा आरोप केला तर पतंगरावांच्या वतिने बोलताना प्रतिक पाटील यांनी दादांवर बायकोचा फार्म हाऊसचा हट्ट पुरवण्यासाठी नदीचा प्रवाह बदलल्याचा आरोप केला. यातला कोणताही आरोप संदिग्ध नव्हता. ठोस होता. दादांनी पतंगराव कदम यांच्यावर आरोप करताना, त्यांनी जमिनी कशा हडप केल्यात याची माहिती दिली तर त्यांना तोंड दाखवणे मुष्कील होईल असे म्हटले.
भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईत केलेल्या एका भाषणात आपल्या निवडणुकीसाठी आठ कोटी रुपये खर्च केल्याचे कबूल केले. भाषणात उच्चारलेले हे एक वाक्य म्हणजे फार मोठा पुरावा आहे असे मानून महाराष्ट्र राज्याचे गृहखाते नको एवढ्या तत्परतेने कामाला लागले. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी या वाक्याची ध्वनिफित निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली असल्याचे चोवीस तासाच्या आत जाहीर केले. हे काम त्यांनी मोठ्या तातडीने पार पाडले. भाषणातले वाक्य खरे धरून गोपीनाथ मुंडे यांच्या विरुद्ध आयकर खाते आणि निवडणूक आयोग या दोन यंत्रणा कामाला लागल्या. सांगलीत दादा आणि प्रतिक पाटील यांनी केलेेले आरोप जाहीररित्या केले आहेत. एवढे उघडपणे हे आरोप होऊन सुद्धा आर.आर. पाटील यांचे गृहखाते यापैकी कोणत्याही मंत्र्याच्या आरोपावरून गोपीनाथ मुंडे यांच्या प्रकरणाप्रमाणे तातडीने कामाला लागलेले नाही. आता खरे तर गृहखात्याच्या अधिकार्यांनी आणि गृहमंत्र्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन पतंगरावांनी हडप केलेल्या जमिनीचे तपशील मिळवले पाहिजे आणि त्या सर्व जमिनींच्या संपादनाची चौकशी करून पतंगराव कदम यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई केली पाहिजे.
त्याच बरोबर प्रतिक पाटील यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या फार्म हाऊसचे तपशील जाणून घेतले पाहिजेत. पण हे गृहखाते हे काम करणार नाही, कारण त्याला मुळात भ्रष्टाचार कमी करायचाच नाही. गेली चौदा वर्षे महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या दोन पक्षांच्या युतीचे सरकार आहे. आपण परस्परांविषयी काही बोलताना समाजात आपली प्रतिमा वाईट होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे, ही गोष्ट मात्र या दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ आणि शहाण्यासुरत्या मंत्र्यांना कळत नाही. उभय पक्षाच्या नेत्यांनी संधी मिळेल तेव्हा परस्परांच्या विरोधात इतके गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत आणि परस्परांचे एवढे वाभाडे काढले आहेत की, त्यांनी एकमेकांवर केलेले हे सारे आरोप एकाखाली एक लिहून काढले तर त्यातून या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रतिमा इतकी वाईट होऊन पुढे येते की, आपल्या राज्यावर मंत्र्यांचे आणि नेत्यांचेच राज्य आहे की चोरांचे राज्य आहे असा प्रश्न पडावा. यातला चोर हा आरोप आम्ही आमच्यावतीने करीत नाही तर तो त्यांनी परस्परांवर केलेला आहे. सांगलीच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तर अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातल्या सगळ्याच कॉंग्रेसच्या नेत्यांचे वस्त्रहरण करण्याचे ठरवले. अजित पवार यांचे हे म्हणणे काही खोटे नाही.
कॉंग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करून भरपूर पैसा कमवलेला आहे हे सत्यच आहे. परंतु अजित पवार नेमकेपणाने हे भ्रष्टाचार उघड करत नाहीत. एखाद्या ब्लॅकमेल करणार्या गुन्हेगाराप्रमाणे ते या नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करण्याची फक्त धमकी देत आहेत. एकेक प्रकरण उघड केल्यानंतर तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही एवढे गंभीर गुन्हे कॉंग्रेसच्या नेत्यांनी केले असतील आणि त्यांची माहिती अजित पवार यांच्याकडे असेल तर त्यांनी ती उघड केली पाहिजे. पण ते उघड न करता त्यांच्यावर ते उघड करण्याचा दबाव टाकत आहेत. देशाच्या राजकारणाला आणि समाजकारणाला भ्रष्टाचाराची मोठी कीड लागलेली आहे. अशा परिस्थितीत एखाद्या राज्याचा उपमुख्यमंत्री भ्रष्टाचाराची आपल्याला माहीत असलेली प्रकरणे चौकशीसाठी पोलिसांकडे नेत नसेल तर त्याचे हे कृत्य एक प्रकारे भ्रष्टाचारावर पांघरूण घातल्या सारखेच होईल. देशातला भ्रष्टाचार वाढण्याचे हेही एक कारण आहे. अजित पवार यांना भ्रष्टाचार कमी करायचा नाही. त्यांना फक्त कॉंग्रेसच्या नेत्यांना भ्रष्टाचार उघडा करण्याची धमकी देऊन मंत्रिमंडळात किंवा सरकारमध्ये मोठा वाटा हवा आहे. हीच गोष्ट कॉंग्रेसकडून सुद्धा केली जात आहे.