सुशीलकुमार शिंदेंचाही आदर्शमध्ये बेनामी फ्लॅट?

मुंबई दि.६ – केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाही वादग्रस्त आदर्श बिल्डींगमध्ये बेनामी फ्लॅट असल्याने त्यांनाही आदर्श घोटाळ्यात आरोपी केले जावे अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते प्रवीण वाटेगांवकर यांनी सीबीआय मार्फत सुशीलकुमार शिंदे यांची चौकशी करून त्यांना आरोपी बनविण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशीही मागणी केली आहे.

या याचिकेनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुशीलकुमार यांनी आदर्श इमारती संदर्भातल्या फाईल्स हाताळल्या आहेत. तसेच त्यांनी दक्षिण मुंबईतील या आलिशान ३१ मजली इमारतीत बेनामी फ्लॅटही घेतला आहे असे म्हटले गेले आहे. वाटेगांवकर यांनी शिंदे यांनीच मेजर खानखोजे यांना या सोसायटीचे सदस्य बनवून घेतले जावे असा सल्ला दिला होता. या प्रकरणाच्या चौकशीत खानखोजे यांचे चिरंजीव कॅप्टन किरण यांनी न्यायालयापुढे वडिलांची या सोसायटीत फ्लॅट घेण्याची आर्थिक स्वातंत्र्यता नव्हती व म्हणूनच त्यांना सोसायटीचे सदस्यत्व नाकाराले गेले होते अशी साक्ष दिली आहे. तसेच त्यांनी या फ्लॅटबाबत कधीच कांही माहिती न दिल्याचेही किरण यांनी सांगितले होते.

खानखोजे यांच्या नावाने असलेल्या फ्लॅटचे पैसे कुणी भरले आणि ते पैसे कोठून आणले गेले याची चौकशी केली जावी अशी मागणी या याचिकेत केली गेली आहे. या याचिकेवर येत्या ८ जुलैला सुनावणी होणार आहे.

Leave a Comment