न्यूयॉर्क दि. ६ – बाजारात खरेदीला गेल्यावर अनेक वेळा घरात नक्की काय शिल्लक आहे हे पाहायचे राहून गेलेले असते. अर्थात हा अनुभव जगभरातील लोकांना नित्याचा असतो. भाजीपाला, किराणा सामान, फळफळावळ अशी खरेदी करताना तर नेहमीच ही अडचण येत असते. अंडीही त्याला अपवाद नाहीत. पण आता संशोधकांनी शोधलेल्या एका उपकरणामुळे अगदी दुकानात असलात किंवा जगाच्या पाठीवर कुठेही हिंडत असलात, तरी घरातील फ्रिज मध्ये किती अंडी शिल्लक आहेत हे तुम्हाला जागेवरच समजू शकणार आहे.
एग माईंडर असे नामकरण केलेल्या या उपकरणात अंड्यांसाठी पांढरा ट्रे तयार केला गेला असून त्याला वायफाय चीप बसविली गेली आहे. ही चीप इंटरनेटशी कनेक्ट आहे. १४ अंडी मावू शकतील अशा या ट्रे मध्ये प्रत्येक कप्प्याच्या तळाशी सेन्सर बसविला गेला आहे. या सेन्सरमुळे त्या कप्प्यात अंडे आहे का नाही याची माहिती वायरलेसने तुमच्या स्मार्टफोनकडे पाठविली जाते. ही माहिती विंगअॅपला पुरविली जाते आणि ती तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरून पाहता येते.
हे उपकरण बॅटरीवर चालते तसेच त्याला एलईडी लाईटची सुविधाही दिली गेली आहे. यामुळे अंडे किती शिळे आहे का ताजे आहे हेही समजू शकते असा जीई अॅन्ड क्वीर्की या उत्पादक कंपनीचा दावा आहे. ग्राहकांना हे उपकरण अवघ्या १४ डॉलर्समध्ये मिळू शकणार आहे. मात्र त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण कंपनी किती ग्राहक हे उपकरण खरेदी करण्यास तयार होतील याचे सर्वेक्षण सध्या करत आहे.