गणेश नाईक यांना हायकोर्टाचा दणका

मुंबई- ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे बेलापूर एमआयडीसीमधील ग्लास हाऊस पाडून बावळेश्वर मंदिराची जागा ताब्यात घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हे ग्लास हाऊस पुढील दोन आठवड्य़ात पाडण्याचे आदेश न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठाने दिले आहेत. ३०१ चौ.मी. भूखंडावर बांधण्यात आलेला हा बंगला बेकायदा असून, तो पाडण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नवी मुंबई येथील संदीप ठाकूर यांनी केली होती. हा कोर्टाचा निर्णय पालकमंत्री नाईक यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

त्यासोबतच यावेळी कोर्टाने एमआयडीसीला हे ग्लास हाऊस पुढील दोन आठवड्य़ात पाडण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास नवी मुंबई महापालिकेनं हे ग्लास हाऊस पाडावे असंही आदेशात नमूद करण्यात आले आहे गणेश नाईक यांच्या मालकीचे हे ग्लास हाऊस नाही तर मग ऑक्टोबर आणि डिसेंबर २०११ मध्ये नाईक ७२ वेळा या ग्लास हाऊसमध्ये कशासाठी गेले होते असा सवालही हायकोर्टाने उपस्थित केला आहे. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले आहेत.

या अनधिकृत बंगल्याचे बांधकाम होत असताना कारवाई करण्याऐवजी पालिका अधिका-यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. हे बांधकाम केवळ या अधिका-यांच्या आशीर्वादामुळेच उभे राहू शकले आहे. सध्या `ग्लास हाऊस`चा ताबा ज्यांच्याकडे आहे त्या संतोष तांडेल यांनी येत्या दोन आठवड्यांत स्वत:हून ते तोडावे अन्यथा त्यानंतर नवी मुंबई पालिकेने ही कारवाई करून त्याचा पूर्तता अहवाल ८ ऑगस्टला न्यायालयात सादर करावा. पुढील सुनावणी २३ ऑगस्टला ठेवण्या‍त आली आहे.

Leave a Comment