पतियाळा महाराजांच्या डिनरसेटची २० लाख पौंडाना विक्री

लंडन दि.६ – भारतातील पंजाब प्रांतातील पतियाळा महाराजांच्या १४०० पिस असलेल्या चांदीच्या डिनरसेटला ख्रिस्टीकडून करण्यात आलेल्या लिलावात तब्बल १९.६० लाख पौंड इतकी किंमत मिळाली आहे. पतियाळाचे महाराज भूपेंदर सिंग यांनी हा डिनरसेट खास प्रिन्स ऑफ वेल्स यांच्यासाठी सुमारे १०० वर्षांपूर्वी बनवून घेतला होता.

आजपर्यंत जगात इंग्लिश डिनरसेटला मिळालेली ही किंमत सर्वाधिक असून हा सेट ५०० किलो चांदीपासून बनविला गेला आहे. अतिशय सुंदर कलाकुसर आणि कोरीवकाम असलेला हा सेट खरेदी करणार्‍या ग्राहकाचे नांव गुप्त ठेवण्यात आले आहे. महाराजा भूपेंदरसिंग यांच्या संस्थानाला तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स भेट देणार होते त्याचे निमित्त साधून हा सेट बनविला गेला होता. नंतर हेच प्रिन्स १९२२ मध्ये किंग एडवर्ड आठ व ड्यूक ऑफ विंडसर बनले होते. त्यांच्या भेटीच्या वेळी खास पोलो मॅचेस, नृत्य, मेजवान्या, डुकराची शिकार आणि शूटिंग असेही कार्यक्रम पार पाडले गेले होते असे सांगितले जाते.

हा सेट लंडनच्या गोल्डस्मिथ व सिल्व्हरस्मिथ कंपनीने तयार केला होता. महाराजा हे त्याकाळी स्वतःचे खासगी विमान असलेले श्रीमंत व्यक्ती होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या ताफ्यात २० रोल्सराईस गाड्या असत असेही समजते.