निकारग्वा, व्हेनेझुएलाची स्नोडेनला आश्रय देण्याची तयारी

मनागू (निकारग्वा) दि.६ – अमेरिकेच्या गुप्त संस्थेची गुप्त कागदपत्रे फोडणारा व सध्या मास्को विमानतळावर असलेला स्नोडेन याला आश्रय देण्याची तयारी निकारग्वाचे अध्यक्ष डॅनियल ओर्टेगा यांनी दाखविली आहे. अशीच तयारी व्हेनेझुएलानेही दाखविली असल्याचे समजते.

याविषयी माहिती देताना निकारग्वाचे अध्यक्ष ओर्टेगो म्हणाले की मास्कोहून त्यांच्याकडे स्नोडेनतर्फे आश्रय देण्याविषयीचा अर्ज आला आहे. त्याला आश्रय देण्यास आम्ही स्वतंत्र आहोत आणि परिस्थिती अनुकुल असेल तर आम्ही त्याचे आनंदाने स्वागत करू. मानवतावादी दृष्टीकोनातून या तरूणाचे रक्षण करणे आवश्यक असून आम्ही त्याला त्या दृष्टीकोनातूनच आश्रय देऊ इच्छीतो.

विकिलिक्सने जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे स्नोडेनतर्फ २७ देशांकडे आश्रयासाठी अर्ज केले गेले आहेत. त्यातील २१ देशांची नावे जाहीर केली गेली होती. मात्र बहुसंख्य युरोपिय देश तसेच ब्राझील आणि भारताने त्याला आश्रय नाकाराला आहे. जगातील बलाढ्य साम्राज्य असलेल्या अमेरिकेकडून स्नोडेनला आश्रय दिला जाऊ नये यासाठी जे दडपण आणले जात आहे, त्यामुळेच अन्य सहा देशांची नांवे जाहीर केली गेलेली नाहीत असा खुलासाही विकिलिक्सने केला आहे.

व्हेनेझुएलाचे निकोलस मदुरो यांनीही स्नोडेनला आश्रय देण्यास त्यांचा देश तयार असल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Comment