ग्राणीम भागात सामुहिक व यांत्रिक शेती हाच पर्याय – प्रभाकर देशमुख

बारामती, दि. 6 – भारतात सत्तर टक्के हा छोटी शेतीवाला शेतकरी असल्याने येथे यांत्रिक पद्धतीने शेती करता येणे अशक्य आहे, अशा परिस्थितीत संघटित शेती केल्यास यांत्रिकीकरणाने शेती करणे सुलभ होईल, असे मत विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी येथे सुरू असलेल्या पहिल्या ग्रामीण आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदे अंतर्गत कृषी उद्योजकतेच्या संधी या विषयावर बोलताना सांगितले.त्यावेळी आयएसएपी या संस्थेचे सुदर्शन सुर्यवंशी, टीसीएस या संस्थेच्या एम-कृषी या प्रकल्पाचे प्रमुख राजेश उरकुडे, हैदराबाद स्थित आयकॅप या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल रेहमान इलियास व राष्ट्रीय शेती-विपणन संस्थेचे निर्देशक डॉ. रमेश मित्तल उपस्थित होते.

देशमुख म्हणाले,गेल्या अनेक वर्षातील सदोष पद्धतीने शेती झाल्याने मातीतील सुपीकता कमी होत आहे. तसेच गेल्या तीस वर्षात जमीनीतील नायट्रोजनचे प्रमाण कमी झाले आहे. यावर सेंद्रीय शेती मायदेशीर ठरू शकेल. तसेच सामूहिक पद्धतीने शेती व्यवसाय केल्यास यांत्रिकीकरणाचा वापर करणे अधिक सुकर होईल. पण त्याचबरोबर योग्य प्रकारे शेतमालाचे ग्रेडींग व पॅकिंग केल्यास शेतमालाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणाही होईल. सामूहिक शेतीमुळे महिलांना निर्णयप्रक्रियेत सहभागी होता येईल. तसेच अडथळ्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन झाल्यास अनेक संधी निर्माण होऊ शकतील असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला. कृषी उद्योजकतेबाबत मार्गदर्शन करताना टीसीएस या संस्थेच्या एम-कृषी या प्रकल्पाचे प्रमुख राजेश उरकुडे म्हणाले, सध्या शेतकर्‍यांच्या मनामध्ये माझ्या उत्पादनाला योग्य किंमत मिळेल का?, रास्त दरात संस्थात्मक कर्जे मिळतील का?, गुणवत्तापूर्ण खते-कीटकनाशके मिळतील का? असे नानाविध प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभे असतात. यावर मात करण्यासाठी कृषी उद्योजकता मायदेशीर ठरू शकेल.

शेतीशी संबंधित संशोधनविषयक बाबी अधोरेखित करताना अब्दुल रेहमान इलियास म्हणाले, ऐतिहासिक काळापासून भारतामध्ये शेतीचा निरंतर विकास होत गेला आहे. शेतीला पूरक अशी ग्रामीण उद्योजकता विकसित झाल्यास संशोधनाला अधिक वेग येऊन हा विकास असाच पुढे होत राहील. तसेच शेतीविषयक ज्ञानाचे योग्य व्यवस्थापन व अंमलबजावणी केल्यास शेतीक्षेत्रात वेगाने प्रगती घडून येईल.

Leave a Comment