मोदींची लोकसभा निवडणुकीची अधिकृत प्रचारमोहिम सुरू

नवी दिल्ली दि.५ – गुजराथचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय निवडणूक प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी आज म्हणजे शुक्रवारपासूनच पक्षाची २०१४ लोकसभा निवडणुकांसाठीची अधिकृत प्रचार मोहिम सुरू करत असल्याचे वृत्त आहे. कालच भाजप पार्लमेटरी बोर्डाची बैठक दिल्लीत पार पडली असली तरी मोदींनी सादर केलेल्या आराखड्याला ज्येष्ठ नेते आडवानी यांच्याकडून नापसंती दर्शविली गेली असल्याचेही अंतर्गत गोटातून समजते.

शनिवारी म्हणजे उद्या मोदी बिहारमधील पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांना अहमदाबादेतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. गुजराथ विधानसभा निवडणुकांत मोदींनी याच तंत्राचा अतिशय यशस्वी वापर केला आहे. मोदींची प्रचारप्रमुख पदी निवड झाल्यानंतरच बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि भाजपमध्ये फूट पडली आहे. मोदी बिहारमधील सुमारे दीड हजार पक्ष कार्यकर्त्यांशी शनिवारी संवाद साधणार आहेत. तसेच देशाचा विविध भागात भेटी देऊन ते कार्यकर्ते आणि नेत्यांशी बोलणार आहेत. १६ जुलैला मोदी ओरिसातील जगन्नाथ पुरी येथे पक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर २७ जुलैला आंध्रात भेट देणार आहेत.

काल दिल्लीत झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत काँग्रेसकडून सीबीआयचा केला जात असलेला गैरवापर आणि अन्न सुरक्षा विधेयकावर जशी रणनिती ठरविली गेली तसेच आगामी निवडणुकांत सोशल मिडियाचा प्रचार मोहिमांसाठी जास्तीत जास्त वापर करण्यासंबंधीही निर्णय घेण्यात आला. मात्र प्रचारासाठी स्टार नेते कोण असतील याचा निर्णय देशाच्या विविध राज्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांशी बोलून मगच घेतला जाणार आहे असेही समजते.

Leave a Comment