जात सर्वत्र प्रबळ

नामवंत दलित लेखक लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्या या आत्मकथनात एक प्रसंग आहे. स्वत: लक्ष्मण गायकवाड शाळेत जायला लागले तेव्हा त्यांच्या वस्तीतल्या काही मुलांना खरूज आली. त्यावर जात पंचायत भरली. उचल्या हा त्यांचा समाज. या पंचायतीमध्ये वस्तीतल्या मुलांना खरूज का होत आहे, यावर बरीच चर्चा झाली आणि लक्ष्मण शाळेत जायला लागला त्यामुळे मुलांना खरूज होत आहे अशा निष्कर्षाप्रत या जात पंचायतीतले जाणते लोक आले. त्यांनी आपल्या वस्तीवरचे हे अरिष्ट टाळण्यासाठी लक्ष्मणला शाळेतून काढावे, असा आदेश लक्ष्मणच्या आई-वडिलांना दिला. आपल्या जातीमध्ये कुणीही शिक्षण घेऊ नये असा धर्माचा आदेश आहे. पण तो आदेश न जुमानता लक्ष्मण शाळेत जात आहे. त्यामुळे आज केवळ खरूज आली उद्या यापेक्षा मोठे संकट येऊ शकते, असा धाक जात पंचायतीने लक्ष्मणच्या आई-वडिलांना घातला. शेवटी त्यांची समजूत घालण्यात आली, त्यामुळे लक्ष्मणचे शिक्षण होऊ शकले. परंतु भारतातल्या विविध जात पंचायती कसे निर्णय देत असतात याचा हा एक ज्वलंत नमुना आहे. या जात पंचायतींमुळे समाज मागे पडला आहे.

आता सध्या नाशिक जिल्ह्यातल्या भटके जोशी समाजातल्या जात पंचायतीच्या, अनेकांना जातीबाहेर काढण्याच्या निर्णयावरून मोठी खळबळ उडालेली आहे. या समाजातील काही सुशिक्षित तरुण आणि तरुणी जाती बाहेरच्या मुला-मुलींशी विवाह करत आहेत ही गोष्ट या जात पंचायतीला मान्य नाही. आपल्या जातीतल्या मुला-मुलींनी इतरांंशी विवाह करणे हे जातीसाठी घातक आहे आणि त्यामुळे आपली जात टिकणार नाही, रक्तशुद्धी अबाधित राहणार नाही, संकर होईल या कल्पनांनी अस्वस्थ झालेल्या तथाकथित जात पंचांनी हा निवाडा दिला आहे.

या कथित पंचांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला कोणी हा प्रश्‍न उपस्थित केला जातो. परंतु आपल्या समाजामध्ये लोकांच्या मनावर जातींचे एवढे प्राबल्य आहे की, हा अधिकार दिला कोणी, हे विचारण्याचे साहस कोणी करत नाही. हा अधिकार जातीने दिलेला असतो. या लोकांनी दिलेले आदेश, त्यांनी दिलेला निवाडा आणि त्या संबंधात त्यांनी काढलेले फतवे हे त्या जातीत मानले जातात. फतवे मानले जातात याचा अर्थ त्यांना मान्यता आहे असा होतो आणि त्यातून त्यांची टगेगिरी सुरू होते. भारतामध्ये जात हे एक वास्तव आहे. जातीचे आदेश मानले पाहिजेत, जातीसाठी माती खाल्ली पाहिजे, असा मानणारा एक मोठा वर्ग प्रत्येक जातीमध्ये आहे. आपण आपले सामाजिक जीवन वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जगत असतो. अनेक संघटनांनी आपले सामाजिक जीवन बनलेले असते. जात ही एक अशीच संस्था आहे आणि जातीचा अभिमान बाळगणे ही त्या त्या जातीमध्ये चांगली गोष्ट मानली जाते. चांगले शिकले सवरलेले लोक सुद्धा जातीला पकडून राहतात.

राजकीय पुढारी जातीगत भावनांना खतपाणी घालतात. अशा जाती संघटित राहिल्या, त्यांची अधिवेशने झाली, त्या जातीचे काही समान प्रश्‍न आहेत असे वातावरण तयार केले की त्यांची एक मतपेढी बनते आणि ती बळकट केली की पुढार्‍यांचे काम भागते. मग समाजामध्ये अमूक जात अमक्या पक्षाच्या मागे उभे राहणार, तमूक जात तमक्या पक्षाच्या मागे उभे राहणार अशा घोषणा केल्या जातात. अशा मतपेढ्या बनलेल्या जातींमध्ये अधिवेशनातून निवडून आलेले पुढारी राजकीय निर्णय घेतात आणि अशा जातींच्या मतपेढ्या बनल्या की, त्या बनवणार्‍या पुढार्‍यांना त्या जातींच्या मतांचे ठेकेदार समजले जाते. अशा ठेकेदारांचे सत्ताधारी पक्षांंशी लागेबांधे असतात आणि त्या लाग्याबांध्यांतून ते समाजातल्या लोकांची सरकार दरबारी अडलेली कामे करत असतात. या कामातूनच त्यांची ठेकेदारी समाजमान्य झालेली असते. या ठेकेदारीला कोणी आव्हान दिले तर त्याला समाजातून प्रखर विरोध होतो. तेव्हा समाजातल्या लोकांची सरकार दरबारी होणारी कामे हा या पुढार्‍यांच्या ठेकेदारीचा आधार असतो. जवळजवळ अशीच परिस्थिती जात पंचायतींची असते. जात पंचायतीने विवाहाच्या संदर्भात एखादा निर्णय दिला तर तो मानणे कोणावरही बंधनकारक नाही. कायद्याने तर अशा प्रकारचे निर्णय हा गुन्हाच असतो. तरीही जात पंचायतींचे न्यायदान सरकारी न्याय व्यवस्थेला आव्हान देऊन जारी आहेत.
तसा विचार केला तर जात ही यंत्रणा आजच्या आधुनिक काळामध्ये कालबाह्य ठरली आहे. निदान शहरात तरी तसे मानले जाते. नोकरी, व्यवसाय, पैशांचे व्यवहार, शिक्षण या गोष्टींवर आपले जीवन अवलंबून असते आणि यातले कोणतेही निर्णय जातीने दिलेले नसतात. त्यामुळे तसा विचार केला तर जात पंचायतीने बहिष्कार घातला म्हणून कोणाचेही जगणे मुश्कील होता कामा नये. परंतु आपल्या जीवनात अजून तरी विवाह आणि सोयरसंबंध हे जातीवरच आधारलेले आहेत. त्यामुळे जिथे या गोष्टींचा संबंध येतो तिथे मात्र जातीचा प्रश्‍न उपस्थित होतो हे वास्तव आहे. विविध जातीतल्या तरुण-तरुणींचे विवाह जोपर्यंत जातनिरपेक्ष भावनेतून सर्रास होत नाहीत तोपर्यंत विवाहाशी जातीचाच संबंध येतो आणि हे वास्तव आहे. त्यामुळेच जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रश्‍न आला की त्या जातीतला सामान्य सांसारिक माणूस घाबरून जातो. बहिष्कृत केल्यास मुलींचे विवाह कसे होतील, घरातल्या कोणा वृद्धाच्या अंत्येष्टीला कोण येईल, असे प्रश्‍न त्यांना सतवायला लागतात. म्हणून जात पंचायतीची टगेगिरी चालते.

Leave a Comment