अवघे २०० वर्षे वयमानाचा मासा मिळाला

सिटका दि.५ – सिएटल येथील मच्छीमाराने अलास्काजवळ पकडलेला मासा दोनशे वर्षांचा असावा असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. रॉक फिश प्रकारचा हा मासा शॉर्टरेकर नावाने ओळखला जातो. मच्छीमाराने पकडलेला हा शॉर्टरेकर ४१ इंच लांब आणि ४० पौंड वजनाचा आहे. केशरी रंगाचा हा मासा समुद्रात ९९० ते १६५० फूट खोल पाण्यात राहतो. या मच्छीमाराने पकडलेला मासाही ९०० फूट खोल पाण्यात पकडला आहे.

शॉर्टरेकर जगातील सर्वात जुन्या जिवंत माशांपैकी एक मानले जातात. त्यांचे आयुष्य साधारण १२० वर्षांचे असते. अलास्का किनारा, पूर्व रशिया तसेच उत्तर कॅलिफोर्निया भागात ते सापडतात. हे मासे वर काढले गेले तर ते जिवंत राहू शकत नाहीत. मच्छीमाराने पकडलेल्या माशाचे कांही नमुने अलास्का डिपार्टमेंट ऑफ फिश अॅन्ड गेम या संस्थेकडे पाठविण्यात आले असून तेथे त्याचे नक्की वय समजू शकणार आहे.

Leave a Comment