नवी दिल्ली – सातारा जिल्ह्यातील कराडचे माजी खासदार श्रीनिवास
पाटील यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून आज नेमणूक करण्यात आली.
राष्ट्रपती भवनातर्फे त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सिक्कीमचे
सध्याचे राज्यपाल बी. पी. सिंग यांची पाच वर्षांची मुदत येत्या नऊ जुलैला
संपत आहे. त्यानंतर पाटील यांनी सूत्रे हाती घेणे अपेक्षित आहे.
सिक्कीमचे नवे राज्यपाल श्रीनिवास पाटील
पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासून कराड मतदारसंघाचे
लोकसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. लोकसभेत एक सक्रिय लोकप्रतिनिधी
म्हणून त्यांनी कामगिरी बजावली होती. लोकसभा सभापतींच्या पॅनेलचेही ते
सदस्य होते. सिक्कीमचे राज्यपालपद ही विशेष जबाबदारी मानली जाते. हे
राज्य चीनला लागून असल्याने भूराजनैतिकदृष्ट्या त्याचे महत्त्व वादातीत
आहे.
बी. पी. सिंग माजी केंद्रीय गृहसचिव आहेत. नऊ जुलै 2008 मध्ये त्यांची
सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली होती. पाटील यांच्या नेमणुकीचे
आणखी एक राजकीय वैशिष्ट्य म्हणजे यूपीएचे नेतृत्व करणार्या काँग्रेसने
प्रथमच आपल्या आघाडीतील घटक पक्षाच्या एका नेत्याला राज्यपालपदासाठी संधी
दिली आहे. गेल्या नऊ वर्षांत काँग्रेसने आपला पक्ष वगळता आघाडीतील इतर
पक्षांना राज्यपालपद किंवा तत्सम पदांसाठी विचारात घेतले नव्हते. परंतु,
आघाडी सरकारची दुसरी कारकीर्द संपतासंपता काँग्रेसला हा मोठेपणा सुचला
असे मानावे लागेल. राजकीय अपरिहार्यतेचाही भाग म्हणून या निर्णयाकडे
पाहिले जात आहे.
