जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर?

सांगली, दि.4 –  राष्ट्रवादीने काँग्रेस बरोबर जनतेचाही विश्वासघात केला आहे. मित्रपक्ष असतानाही सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने जातीयवादी पक्षांचा आधार घेवून अनेक ठिकाणी सत्ता मिळवल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना काँग्रेस प्रवेशाचे वेध लागले आहेत आपणास काँग्रेसमध्ये घ्यावे असे सांगत  जयंतराव पाटील यांनी सोनिया गांधींकडे साकडे घातले आहे. त्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोटही माणिकराव ठाकरेंनी केला.

सांगली महापालिका निवडणुकीतील काँग्रेस  उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांनी संयुक्त सभा घेतल्या. या वेळी माणिकराव ठाकरे बोलत होते. यावेळी माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसन राज्यात अनेक ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी भाजपा सेनेसारख्या जातीयवादी पक्षांचा आधार घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हे सातत्याने सोनिया गांधी आणि काँग्रेस नेतृत्वावर टीका करतात आणि हेच जयंत पाटील सोनिया गांधी मुंबईत आल्या की मला काँग्रेस पक्षात कधी घेता म्हणून त्यांच्या कानात सांगतात. तसेच अनेकवेळा त्यांनी मला काँग्रेसमध्ये कधी घेणार असे साकडेसुद्धा सोनिया गांधींना घातले  आहे. त्यामुळे जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा अप्रत्यक्ष गौप्यस्फोट माणिकराव ठाकरेंनी केला.

माणिकराव ठाकरेंच्या टीकेचा संपूर्ण रोख हा राष्ट्रवादीवर होता. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचाच मानिकरावांचा प्रयत्न सुरु आहे. त्यांच्या या टीका पाहिल्या तर काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढण्याची सर्व तयारी सुरु केल्याचे स्पष्ट होते. काँग्रेसचे हे आरोप प्रत्यारोप म्हणजे विधानसभा लोकसभेची रंगीत तालीमच म्हणावी लागेल. 
 
कधीही सोनिया गांधीना भेटलेलो नाही – जयंत पाटील यांचा खुलासा

आपण कधीही सोनिया गांधीना भेटलेलो नाही, यामुळे माणिकराव ठाकरे यांनी केलेले आरोप नैराशेतुनच केल्याचा खुलासा ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.माणिकराव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे.  त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणेच योग्य ठरेल असेही जयंत पाटील यांनी  स्पष्ट केले आहे. ते सांगली येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कधीही काँग्रेस पक्षाचा  विश्वासघात केला नाही उलट राष्ट्रवादीच्या पाठींब्याने राज्यात तीन टर्म सत्ता मिळवता आली आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीत माणिक रावांनी आघाडीचा धर्म मोडणे योग्य ठरणार नाही असे मतही जयंत पाटील यांनी  व्यक्त केले.

Leave a Comment