गडकरी यांच्यावर नवी जबाबदारी

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय राजकारणा पासून दूर असलेले भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी नाराज असल्याची चर्चा होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्यावर पुन्हा नव्याने मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते. आगामी काळात चार राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे गडकरी यांच्यावर दिल्लीसह अन्य दोन राज्यांच्या निवडणूक प्रचाराची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गडकरी यांना काही दिवसांपूर्वी त्यांना भाजपच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यांनतर त्यांच्याकडे कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याबत आली नव्हती. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गडकरींना लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी दिली जावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी गडकरी यांनी आपल्याला त्यात रस नसल्याचे सांगितले होते. काही काळ ते नाराज असल्याची चर्चा होती.

आगामी काळात चार राज्यांतील निवडणुका होत आहेत. या निवडणुका भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी गडकरींची नाराजी दूर करण्याचे ठरवले आहे. राजधानी दिल्लीसह दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्याची तयारी सुरू केली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही गडकरी यांना पुन्हा केंद्रस्थानी आणण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे.

Leave a Comment