इजिप्तचे हंगामी राष्ट्राध्यक्ष ऍडली मन्सूर

कैरो, दि.4 – इजिप्तमधील लष्कराने उठाव करून राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांना हटविल्यानंतर इजिप्तचे माजी सरन्यायाधीश ऍडली मन्सूर यांनी आज (गुरुवार) हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. मन्सूर यांनी येथील राज्यघटनात्मक न्यायालयात हंगामी अध्यक्षपदाची शपथ घेतली. मन्सूर यांचा शपथविधी कार्यक्रम देशाच्या राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

इजिप्तच्या नवीन राष्ट्राध्यक्षाची निवड होईपर्यंत मन्सूर हे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे सांभाळणार आहेत. नवीन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीचा दिवस अद्यापी ठरावयाचा आहे. देशाचे पहिले लोकशाही मार्गाने निवडून आलेले राष्ट्रध्यक्ष मोर्सी यांना लष्कराने काल हटविल्यानंतर मन्सूर यांचे नाव हंगामी राष्ट्राध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले होते. मोर्सी यांना हटविल्यानंतर इजिप्तमध्ये जल्लोष करण्यात आला होता.  मोर्सी यांना सध्या नजरकैदेत ठेवण्यात आले असून या नजरकैदेचे ठिकाण गुप्त ठेवण्यात आले आहे.

 

Leave a Comment