आशियाई मैदानी स्पर्धेत भारताला दोन ब्रॉंझ

पुणे : बुधवारपासून सुरू झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेत भारताने पहिल्याच दिवशी पदकांचे खाते उघडले. गोळाफेकपटू ओमप्रकाशने भारताला पहिले पदक मिळवून दिले. ओमप्रकाशने १९.४५ मीटरवर गोळाफेक करत कांस्यपदक मिळवले. मयुखा हिने ६.३० अशी लांब उडी मारली आणि ब्रॉंझपदक निश्चित केले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. काल सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी पाच पदकांचा फैसला होता. पहिल्या दिवशी अव्वल भारतीय क्रीडापटूंनी निराशा केल्याने केवळ दोन ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. हरियाणाच्या ओम प्रकाशने गोळाफेकीमध्ये भारताला ब्रॉंझपदक मिळवून दिले. त्याने १९.४५ मीटर अशी कामगिरी नोंदवली. सौदी अरेबियाच्या सुल्तान अब्दुलम अल-हबाशी याने १९.६८ अशी कामगिरी करून सुवर्णपदक मिळवले. तैपेईच्या चेंग मिंग-ह्युंगने १९.६१ मीटर लांब गोळाफेक करून रौप्यपदक पटकावले.

पहिल्या प्रयत्नात मयुखा चुकली, चौथ्या प्रयत्नात तिने ६.३० अशी लांब उडी मारली आणि ब्रॉंझपदक निश्चित केले. जपानच्या मासुमीने सुवर्ण, तर उझबेकिस्तानच्या अनास्तासियाने रौप्यपदक मिळवले.

Leave a Comment