राजकारण इशरत जहॉंच्या हत्येचे

सीबीआयने इशरत जहॉंच्या प्रकरणाचे आरोप पत्र दाखल केले आहे. महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा गावच्या या तरुणीच्या घरची परिस्थिती वाईट होती. तिचे वडील हयात नव्हते आणि तिच्यावर तसेच तिच्या आईवर चार-पाच भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी होती. अशी ही इशरत जहॉं गुजरात सरकारच्या पोलिसांनी घडवलेल्या बनावट चकमकीत विनाकारण मारली गेली. पोलीस जिला चकमक म्हणत आहेत ती चकमक नव्हतीच. तो तर अगदी जवळून गोळ्या झाडून थंड डोक्याने केलेला खून होता असे सीबीआयने या संबंधांत दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे. आपल्याला या चकमकीविषयी आणि पोलिसांविषयी काही म्हणायचे नाही. मात्र सीबीआयच्या या आरोपपत्रात इशरत जहॉं ज्या कारमध्ये येत होती त्या कारमधील अन्य तिघे अतिरेकी होते असे म्हटले आहे. इशरत जहॉं मात्र अतिरेकी नव्हती असे त्यांचे म्हणणे आहे. वृत्तपत्रांनी या बातम्या देताना हे तिघे अतिरेकी होते. याचा ठळक उल्लेख केलेला नाही. वृत्तपत्रांचा भर इशरत जहॉं निरपराध होती हे दाखवण्यावरच आहे. कारण या सर्वांना या निमित्ताने येऊन जाऊन नरेंद्र मोदींना बदनाम करायचे आहे. ते काहीही असो पण या निमित्ताने आपल्यासमोर काही प्रश्‍न निमाणर् होत आहेत. १५ जून २००४ रोजी शहराच्या बाहेरच्या भागात पहाटेच्यावेळी या चौघांना गोळ्या घालून ठार करण्यात आले.

एका कारमधून इशरत जहॉं तिच्या कुटुंबाचा हितचिंतक असलेला जावेद शेख उर्फ प्राणेश पिलाई आणि दोन अतिरेकी होते. हे चौघेही मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी अहमदाबादकडे येत आहेत असा संदेश गुजरातच्या गुप्तचर पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार या गुप्तचर पोलिसांनी या चौघांची गाडी अहमदाबाद शहरात प्रवेश करतानाच अडविली. तिथे घडलेला नेमका प्रकार काय याबाबत पोलिसांचे आणि इशरत जहॉं हिच्या सहानुभूतीदारांचे परस्पर विरोधी दावे आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एका मुस्लीम तरुणीसह चौघांची हत्या केली. ही गोष्ट राजकीयदृष्ट्या वापरण्यासाठी सोयीची असते. म्हणून मोदींच्या राजकीय विरोधकांनी या घटनेची चौकशी करण्याचा सतत तगादा लावला आहे. एकवेळ वादासाठी ही चकमक बनावट होती असे मान्य केले तरी एकाच बनावट चकमकीच्या चौकशीचा पाठपुरावा किती करावा याला काही मर्यादा आहे की नाही? अशी बनावट चकमक काही केवळ गुजरातमध्येच झालेली आहे का? अन्य राज्यात अशा अनेक चकमकी झालेल्या आहेत परंतु या चकमकीवरून त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्याच्या पाठीमागे कोणी चौकशीचा तगादा लावलेला नाही.

गुजरातमध्ये झालेली या चौघांची हत्या बनावट चकमकीत झाली असेल तर ती क्षम्य आहे असे या ठिकाणी म्हणावयाचे नाही. परंतु त्याच्या चौकशीचा पाठपुरावा करणार्‍यांचा हेतू राजकीय आहे हे नमूद करावेसे वाटते. राजकारणात हे क्षम्यसुध्दा आहे. परंतु असा पाठपुरावा करताना आपण आपल्या देशाच्या हितसंबंधांचा काही विचार करणार आहोत की नाही? या संबंधांत काल सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात इशरत जहॉं ही तरुणी अतिरेकी नव्हती असे म्हटले आहे. पण ती ज्या कारमधून प्रवास करत होती त्या कारमध्ये अन्य तिघे मात्र अतिरेकी होते. सीबीआयनेच तसे म्हटलेले आहे. एका कारमध्ये प्रवास करणारे तीन तरुण अतिरेकी असतात आणि ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा गावापासून अहमदाबादपर्यंत रात्रभर त्यांच्या गाडीतून प्रवास करणारी एक तरुणी मात्र देशभक्त असते असे कोणीतरी शहाणा माणूस म्हणू शकेल का? सीबीआयने इशरत जहॉंला देशभक्तीचे प्रमाणपत्र देण्याचे ठरवलेलेच आहे आणि ती तशी असेल तर तिला तसे प्रमाणपत्र देण्यास कोणाचीची हरकत असणार नाही. परंतु सीबीआयच्या आरोप पत्रात ही तरुणी आपल्या नात्यागोत्यात नसणार्‍या तिघां अतिरेकी तरुणांबरोबर कोणत्या उद्देशाने अहमदाबादला जात होती. याचा कसलाही खुलासा झालेला नाही. इशरत जहॉंच्या आईने या आरोपपत्रात नरेंद्र मोदीचे नाव नसल्यामुळे निराशा व्यक्त केली आहे. अर्थात तिचे बोलविते धनी कोण आहेत हे काही सांगण्याची गरज नाही.

मात्र ही दुःखी माता नरेंद्र मोदींना कोणत्या पुराव्याच्या आधारे आरोपी ठरवत आहे ह्याचे उत्तर मिळत नाही. नरेंद्र मोदी यांनीच इशरत जहॉंला ठार करण्याचा आदेश दिला होता याचा कसलाही पुरावा तिच्याकडे नाही आणि सीबीआयकडे तर नाहीच. परंतु या बाईचा उपयोग कसा राजकारणासाठी केला जात आहे याचे हे द्योतक आहे. इशरत जहॉं ही यापूर्वी दोन वेळा प्राणेश पिल्ले उर्फ जावेद शेख याच्यासोबत संशयास्पदरित्या वावरताना गुजरातमध्येच सापडली होती. त्यावेळी तिला पकडण्यातसुध्दा आले होते. तिला बडोदा इथे पकडलेले होते. ती त्या दोन्ही प्रसंगी प्राणेश पिल्लेबरोबर बडोद्याला का गेली होती याचा खुलासा त्या आईनेही केलेला नाही आणि सीबीआयनेसुध्दा केलेला नाही. या चौकशीला गुजरात विरुध्द केंद्र सरकार असा रंग देण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. परंतु अशा लोकांचे दात त्यांच्याच घशात घालणारी एक घटना या संदर्भात घडलेली आहे. इशरत जहॉंसह तीन अतिरेकी मोटारकारमधून अहमदाबादकडे निघालेले आहेत आणि त्यांचा नरेंद्र मोदींना मारण्याचा इरादा आहे असा संदेश गुजरातच्या पोलिसांना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील गुप्तचर विभागानेच दिलेला होता. त्यामुळे केंद्राची पंचाईत झालेली आहे.

Leave a Comment