दिंडी चालली पंढरपुरा

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी निघालेल्या देहू आणि आळंदीच्या तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्‍वरांच्या पालख्यांनी नुकतेच पुण्यातून प्रस्थान केले. या दोन्ही दिंड्यात मिळून पाच लाखावर भाविक सहभागी झालेले आहेत. त्या दिंड्यांची शिस्त, त्यातील भक्तांच्या भक्तीभावाला आलेले उधाण आणि या वारकर्‍यांना मदत करण्यासाठी तत्पर असलेला हिंदूंचा जनसमुदाय या सार्‍या गोष्टी पाहिल्या म्हणजे अनेकांना आश्‍चर्य वाटते. कित्येक शतकांपासून एकाही वर्षाचा खंड न पडता दिंडीची ही परंपरा अखंडपणे जारी आहे. जगभरातल्या व्यवस्थापन संस्थांतील लोकांनी दिंडीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास जरूर करावा इतके दिंडीचे व्यवस्थापन आणि आयोजन नेटकेपणाने केलेले असते. ते करणारा कोणीच नाही. ते आपसूकच होत असते. वारकर्‍यांच्या मनातली भक्तीची भावना त्याला हे करायला भाग पाडते. यावर्षी पंढरपुरात आषाढी एकादशीला १४ लाख भाविक येतील असा अंदाज आहे आणि हा अंदाज अनेक वर्षांच्या अनुभवातून केला गेला आहे. साईबाबांच्या शिर्डीमध्ये गर्दीचा उच्चांक झाला की ४ लाख भाविक आलेले असतात. या ४ लाखाचे भरपूर कौतुक होत असते. परंतु काही शतकांपासून ज्या तीर्थक्षेत्रांमध्ये भक्तांची मांदियाळी जमत असते अशा पंढरपूर आणि तुळजापूर या दोन यात्रांच्या गर्दीची कोणी दखलच घेत नाही.

यावर्षी पाऊसपाणी चांगले झाले आहे. त्यामुळे पंढरपूरच्या आषाढी एकादशीला १४ लाख भाविक येतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षी निसर्गाने अवकृपा केली होती. तसे झाले की काही शेतकरी वारकरी पंढरपूरला येत नाहीत. तरीही गेल्या वर्षी आषाढी एकादशीला ११ लाख भाविक आले होते. पंढरपूरला दक्षिणेची काशी म्हटले जाते. कारण पंढरपूरचा महिमा अगाध आहे. इतिहास तज्ञांच्या मते पंढरपूरचे श्री.विठ्ठलाचे मंदिर हे इसवी सनाच्या पहिल्या शतकातले आहे. त्याला दक्षिणेची काशी म्हणण्याचे कारण असे की त्याच्या दर्शनासाठी कर्नाटक, आंध्र आणि तामिळनाडू या तीन राज्यांतले वारकरीसुध्दा येत असतात. त्याचबरोबर गोवा, मध्यप्रदेश आणि गुजरातमधलेही वारकरी आषाढीला येतात. या राज्यांमध्ये आषाढीच्या एकादशीला पंढरपूरला येण्याची काही भक्तांची परंपरा आहे आणि ती शेकडो वर्षापासून जारी आहे. पंढरपूर हे शहर महाराष्ट्रात असले तरी पाच सहा राज्यांतील भाविकांचे ते तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्रात तर अनेक संतांच्या दिंड्या पायी चालत पंढरपूरला येतात. ग्यानबा तुकाराम हे वारकरी पंथाचे आराध्य दैवत असल्यामुळे ग्यानबा तुकारामचा जयघोष करीत या दोन दिंड्या सुमारे तीन आठवडे पायी चालत पंढरपुरात एकादशीच्या आदल्या रात्री येऊन पोचतात.

या दोन्ही दिंड्यांमध्ये पाच लाखांवर भाविक सहभागी होतात आणि अतीशय शिस्तीमध्ये ठरलेल्या ठिकाणी मुक्काम करीत, मजल दरमजल करीत या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करायला लागतात. दररोज किमान बारा मैल ते कमाल सोळा मैल एवढे अंतर ही मंडळी पायी चालतात. मात्र दिंडीतले वातावरण, मनातल्या भक्तिभावाने शरीराची वाढलेली ताकद यामुळे या वारकर्‍यांतील अगदी वृध्दांनासुध्दा थकवा म्हणून जाणवत नाही. दिंडी घेऊन पायी पंढरपूरला जाण्याची ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली याची नोंद अजून कोठेही सापडलेली नाही. परंतु ती अकराव्या शतकाच्या आसपास कधीतरी सुरू झाली असावी असा कयास आहे. त्यात वरचेवर दिंड्या सामील होत गेल्या आणि वारकरी संप्रदायाची ही परंपरा अधिक व्यापक होत गेली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाविकाला आपल्या आयुष्यात आपण कधीतरी दिंडीत पायी चालत गेले पाहिजे याची ओढ लागलेली असते. प्रत्येकाच्या आयुष्यात ती संधी येईलच असे काही नाही. परंतु अनेक लोक आयुष्यात कधी ना कधी तरी या दिंडीचा अनुभव घेतातच. दिंडीत सहभागी होणे, नामस्मरणाच्या नादात पायी चालणे आणि पंढरीच्या ओढीने पावले पुढे पुढे टाकत एक प्रकारचा स्वर्गीय आनंद लुटत हे हजारो वारकरी चालायला लागतात. तेव्हा त्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तीला आयुष्याचे सार्थक झाल्याचा साक्षात्कार होतो.

ज्यांना दिंडीत जाता येत नाही. ते लोक दिंडीत जाणार्‍या लोकांची खाण्यापिण्याची सोय करतात. लाखो भाविक जात असले तरी त्यांना महाराष्ट्रातले हे दानशूर भाविक त्यांच्या दिंडीच्या मार्गावर खाण्यापिण्याची ददात पडू देत नाहीत. हे सारे आपोआप घडते. वारकरी आपोआप जमा होतात. त्यांना जाहीरात देऊन कोणी आवाहन करत नाही आणि एकही पोलीस बंदोबस्ताला नसतानाही वारी शिस्तीत चालते. हा सारा भक्तीसंप्रदायाचा महिमा आहे. वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने संतांनी अध्यात्माच्या क्षेत्रात साम्यवाद आणलेला आहे. पंढरपूरच्या वाळवंटात संत आणि वारकरी जातीभेद विसरून एकत्र येतात, एकमेकांच्या पाय लागतात. तिथे उच्च नीच हा भेद गळून पडतो. वारकरी संप्रदायाचे ते वैशिष्ट्य आहे. या संप्रदायाने समाजातल्या सर्व घटकांना परेश्‍वराच्या आराधनेचा सोपा मार्ग दाखवला आहे. कूळ, जाती यांचा विचार न करता विठ्ठलाच नामस्मरण करणे हीच ईश्‍वराची भक्ती होय. अशी शिकवण या संप्रदायात दिली जाते. या नामस्मरणाच्या सामर्थ्यावरच संत तुकाराम महाराज यांनी मोक्ष प्राप्ती केलेली आहे. मोक्षासाठी रानावनात किंवा हिमालयाच्या गुफेत जाण्याची गरज नाही. आपला संसार करीत करीत केवळ परमेश्‍वराचे एकचित्ताने नामस्मरण करून मोक्ष प्राप्त होतो. हे त्यांनी पटवून दिले आहे. भल्या भल्या योग्यांनासुध्दा जे दुष्प्राप्य आहे ते केवळ नामस्मरणाने प्राप्त होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातला वारकरी पंथ हा आध्यात्मिक क्षेत्रातला एक चमत्कार आहे.

Leave a Comment