नवी दिल्ली दि.४ – इंटरनेटवर आधारित व्यवसाय भारतात वेगाने भरभराटीस येत असून २०१५ सालापर्यंत म्हणजे एक दीड वर्षातच हा व्यवसाय १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठेल असे इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या व्यवसायाची वेगाने वाढ होण्यात ऑनलाईन जाहिरात क्षेत्र आणि इ कॉमर्स यांचा मोठा हातभार आहे.
वास्तविक भारताचा विचार केला तर इंटरनेट व्यवसाय पायाभूत सुविधा पुरविणार्या जगातील पहिल्या वीस देशांत भारत नाही. सिगापूर, जपान, तैवान, द.कोरिया, हाँगकाँग यांचा समावेश पहिल्या वीस देशांत आहे. भारतात १० टक्के नागरिक ऑलाईन सुविधेचा वापर करतात. मात्र तरीही हा व्यवसाय येथे भरभराटीस येत आहे. २०१५ पर्यंत तो देशाच्या आरोग्य उद्योगाबरोबर येईल असेही या अहवालात म्हटले गेले आहे. भारतात डिजिटल व मोबाईल जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारा महसूल प्रचंड असल्याचेही म्हटले गेले आहे.
भारतातील नागरी आणि ग्रामीण जनतेचे प्रमाण व्यस्त आहे. असे असले तरी ८३३ दशलक्ष ग्रामीण जनतेतही इंटरनेटचा वापर करणार्यांाची संख्या ३.६ टक्के आहे. पैकी १/३ जनतेला सायबर कॅफेत पोहोचण्यासाठी १० मैलांची पायपीटही करावी लागते. मात्र तरीही इंटरनेटची होत असलेली वाढ, सरकारकडून आखल्या जात असलेल्या नवनवीन योजना यामुळे येत्या दिड वर्षात ऑनलाईन व्यवसाय चांगलीच गती घेईल असे मत या अहवालात व्यक्त केले गेले आहे. जगात सध्या या व्यवसायातून मिळणारा महसूल ४१० दशलक्ष डॉलर्स इतका आहे आणि भारताचा त्यातील वाटा ७ टक्के आहे.