आता सीमकार्डसाठीही द्यावे लागणार बोटांचे ठसे

मोबाईल ही आता चैनीची वस्तू राहिलेली नाही. तर मोबाईलने आता अत्यावश्यक बाबींमध्ये आपला समावेश करून घेतला आहे. आपल्याला भेटणारांपैकी अपवादात्मक एखादाच असू शकतो की त्याच्याकडे मोबाईल नाही. मोबाईलचा जसा चांगला वापर होतो. तसाच त्याचा काही वाईट कामांसाठीही वापर केला जात आहे. त्यामुळे आता मोबाइलसाठी सिमकार्ड हवे असल्यास तुम्हांला तुमच्या बोटांचे ठसे द्यावे लागण्याची शक्यता आहे. सिमकार्डच्या पडताळणीसाठी बायोमेटिड्ढक प्रणालीचा वापर करता येईल का? याबाबत गृहमंत्रालयाने दूरसंचार विभागाकडे विचारणा केली आहे.

सिमकार्ड नंबर सक्रिय होण्याआधी ग्राहकांचे बोटांचे ठसे किंवा इतर बायोमेटिड्ढक प्रणालीचा वापर करण्यात यावा, असे गृहमंत्रालयाकडून सुचविण्यात आले आहे. ज्याप्रमाणे आधार कार्डसाठी बोटांचे ठसे घेतले जातात त्याचप्रमाणे सिमकार्डसाठी देखील घेण्यात यावे अशी सूचना मंत्रालयाने केली आहे.

बायोमेटिड्ढक प्रणालीचा वापर केल्यास दूरसंचार विभागाला प्रत्येक ग्राहकाची माहिती सहजपणे प्राप्त होऊ शकेल. राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करता ही माहिती फारच उपयुक्त ठरू शकते. त्यामुळेच केंद्रीय गृहखात्याने सिमकार्डसाठी बायोमेटिड्ढक प्रणालीचा वापर करण्याची सूचना केली आहे. या संदर्भात लवकरच दूरसंचार विभाग टेलिकॉम कंपन्यांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी भारतीय सिमकार्डचा गैरवापर केला होता. यानंतर सिमकार्ड घेण्यासाठी व्यवस्था जास्त परखड करण्यात आली होती. परंतु तरीही सिमकार्डचा चुकीचा उपयोग करणे काही थांबले नाही. सिमकार्ड घेण्यासाठी डॉटने मागील वर्षी फिजीकल व्हेरिफिकेशन ही व्यवस्था लागू केली होती. मात्र अद्याप हे व्हेरिफिकेशन योग्य प्रकारे होत नसल्याचे अनेक राज्यांतील पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच कोणत्याही पडताळणीशिवाय सिमकार्ड सुरू केल्यास संबंधितांना 50 हजार रुपयांचा दंड केला जाण्याची शक्यता आहे.