मूत्रपिंड, यकृत, डोळे यांचे प्रत्यारोपण ही आता नवी किवा नवलाची गोष्ट राहिलेली नाही. मात्र अत्याधुनिक सेल इंजिनिअरींगच्या मदतीने आता मानवी डोक्याचे प्रत्यारोपण करणेही शक्य असल्याचा दावा इटालियन शास्त्रज्ञ डॉ. सर्जिओ कॅनव्हेरो यांनी केला आहे. अर्थात त्यासाठी थोडी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागते मात्र आणखी दोन वर्षात त्यात बरयाच सुधारणा होतील व ही शस्त्रक्रिया सुलभतेने आणि यशस्वीपणे करता येईल असे त्यांचे म्हणणे आहे.
ट्यूरीन अॅडव्हान्स न्यूरोमॉडेल्यूशन ग्रुप येथे कार्यरत असलेले डॉ. कॅनव्हेर यांनी सर्जिकल न्यूरॉलॉजी इंटरनॅशनल जर्नल मध्ये यासंबंधीचा लेख प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार दोन रूग्णांची डोकी अतिशय शार्प ब्लेडने कट करून रिसिपंटच्या डोक्याची साफसफाई केल्यानंतर त्यावर दुसरे कापलेले डोके त्यांनी शोधलेल्या पारदर्शक पॉलिमर ग्लूच्या सहाय्याने जोडता येते. असा प्रयोग १९७० सालीच र्हॉसस माकडावर केला गेला होता व आठ दिवस ते माकड जिवंत होते. त्या काळापेक्षा आताचे तंत्रज्ञान अधिक प्रगत झाले असून सेल थेरपीमुळे त्यात उक्रांतीच घडून आली आहे. अर्थात या शस्त्रक्रियांचे यश वाढण्यासाठी आणखी थोड्या संशोधनाची गरज आहे.
अशी शस्त्रक्रिया ज्या रूग्णावर करायची तो तरूण व मेंदू पूर्ण कार्यरत असलेला असल्यास यशाची खात्री अधिक आहे असे कॅनव्हेरो यांचे म्हणणे आहे. याचा फायदा प्रोग्रेसिव्ह मसक्युलर डायस्ट्रोफी किंवा जेनेटिक डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या रूग्णांना होऊ शकणार असून त्यामुळे चेहरयावर आलेले व्यंग दूर होऊ शकणार आहे.