१४० बॅगांमधील १० कोटी रुपये जप्त

मुंबई: मुंबईत अंगडियांवर टाकलेल्या छाप्यामधल्या मुद्देमालाची मोजणी पूर्ण झाली आहे. रोख रक्कमेची मोजदाद संपली असली तरी दागिन्यांची मोजणी संपण्यासाठी आणखी दोन दिवस लागतील १४० बॅगांमध्ये १० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती, आयकर विभागाचे महासंचालक स्वतंत्रकुमार यांनी दिली. त्याचबरोबर या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या ४७ जणांची चौकशी करुन सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे कालपर्यंत शेकडो कोटींची रक्कम असल्याची शक्यता व्यक्त होत असताना फक्त १० कोटीच मिळाले आहेत.

मुंबई सेंट्रल स्टेशनवर सोमवारी रात्री ९.३० वाजता आयकर विभाग आणि एनआयएने अंगडियांवर केलेल्या कारवाईत चार ट्रक भरुन १५० बॅग जप्त करण्यात आल्या होत्या. हा सर्व माल अहमदाबाद मेलने गुजरातला पाठवला जाणार होता. दरम्यान या पैशांची मोजणी करण्यासाठी ५० अधिकारी काम करत होते. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून काऊंटिग मशीन्स मागवण्यात आल्या होत्या. जप्त केलेला पैसा काळा असण्याची शक्यता आयकर विभागाने वर्तवली आहे.

अंगडियांच्या संबंधित संपत्तीचे योग्य कागदपत्रे नसतील तर त्यांचा पैसा आणि दागिने जप्त करण्यात येतील, असंही विभागाच्या अधिका-यांनी सांगितले आहे. मात्र हा पैसा नेमका कोणी आणि कोणासाठी पाठवला जात होता, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

Leave a Comment