हे घबाड कोणाचे?

मुंबईत काल चार मालमोटारी भरून सापडलेल्या नोटा हा मोठाच अचंब्याचा विषय झाला आहे. सामान्य माणसाला तरी नक्कीच. कारण कसलीही सुरक्षा व्यवस्था नसताना चार मालमोटारींमध्ये भरून केवळ नोटा नेल्या जात होत्या. आपल्यासारख्या सामान्य माणसाला हे नवल वाटते आणि या संबंधात कोणाला शिक्षा होणार का, असा प्रश्‍न आपल्याला पडतो. परंतु या नोटांच्या संदर्भात जे तथ्य समोर येत आहे आणि आयकर अधिकारी जे काही सांगत आहेत त्यानुसार तरी या प्रकरणात कोणालाही शिक्षा होण्याची शक्यता नाही. कारण हा पैसा काही अतिरेक्यांना देण्यासाठी नेला जात होता असे अजून तरी आढळलेले नाही. आतापर्यंत या प्रकरणात ४७ जणांना अटक केलेली आहे. पण ती कोणत्या कलमाखाली आणि कोणत्या गुन्ह्याबद्दल झाली आहे याचा काही उलगडा झालेला नाही. एका ठिकाणाहून दुसरीकडे पैसे नेणे हा कोणत्याच कायद्याच्या कोणत्याही कलमाने गुन्हा ठरत नाही. असे लाखो रुपये रोज मोठ-मोठ्या शहरातून नेले जातात आणि त्यांची देवाणघेवाण होते. या प्रकरणात फक्त हे पैसे मालमोटारीतून नेले गेले आहेत आणि कायद्यामध्ये मालमोटारीतून पैसे नेण्यास बंदी नाही.

कुठे तरी अशा अमाप नोटा सापडल्या की आपल्यासारख्या सामान्य माणसांचे डोळे विस्फारले जातात. अनेक प्रश्‍नांचे भुंगे आपल्याला सतवायला लागतात. यापुढे काय कारवाई होणार? कोणाला पकडणार आणि त्यांना काय शिक्षा होणार? असेही प्रश्‍न उपस्थित होतात. परंतु यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे कदाचित कोणाला माहीत नसेल. गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या काही शहरात अशा रितीने नेले जाणारे लाखो रुपये सापडले आहेत. असे लाखो रुपये नेले जात असल्याचे चोरट्यांना कळते आणि ते अशा वाहतूकदारावर हल्ला करून त्याचे पैसे लुटतात तेव्हा अशा प्रकरणांचा बभ्रा होतो आणि अशी लाखो रुपयांची वाहतूक होत असते हे लक्षात येते. मात्र हे लाखो रुपये नेल्याबद्दल किंवा त्यांची वाहतूक केल्याबद्दल कोणालाही शिक्षा होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. मुंबईत पकडलेल्या नोटा किती रुपयांच्या आहेत याविषयी वेगवेगळे अंदाज समोर आले. ते दीडशे कोटी रुपयांपासून २५०० कोटी रुपयापर्यंत होते. या मालमोटारींमध्ये केवळ नोटाच होत्या असे नाही तर हिरे आणि सोन्याचे दागिने सुद्धा होते. मात्र एकंदरीत अब्जावधी रुपयांची अशी रक्कम मालमोटारीत भरून, कसल्याही सुरक्षा व्यवस्थेविना नेली जात होती ही गोष्ट सामान्य माणसाला आश्‍चर्य वाटावे अशीच आहे.

सकृतदर्शनी तरी ही रक्कम काळ्या बाजारातली असावी, बेहिशेबी किंवा अतिरेकी संघटनांच्या मदतीसाठी असावी अशी शक्यता व्यक्त केली जाते. अशा मोठ्या रकमेच्या वाहतुकीमध्ये गुन्हेगारी विश्‍वाचाही हात असण्याची शक्यता लोकांना वाटते. परंतु हा प्रकार वेगळाच आहे. हे पैसे मुंबईतल्या सोन्या-चांदीच्या व्यापार्‍यांचे आणि अन्य अशा प्रकारचे करोडोंचे व्यवहार करणार्‍या व्यापार्‍यांचे आहेत. या पैशाची देवाणघेवाण नगदी स्वरूपात करण्याची काही गरज नाही. चेक, ड्राफ्ट किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे हे व्यवहार बिनधोकपणे, बिनखर्ची करता येतात. हे मार्ग योग्य वाटत नसतील तर पोस्टाच्या मार्फत ही देवाण-घेवाण करता येते. परंतु सध्या तरी भारताच्या टपाल खात्याची व्यवस्था विश्‍वासार्हही राहिलेली नाही आणि ती विलंबाने काम करत आहे. शिवाय हे व्यवहार बँकांच्या मार्फत करता येत नाहीत. कारण तो नंबर दोनचा पैसा असतो. त्यातल्या मोठ्या भागावर आयकर दिलेला नसतो. वेगवेगळ्या प्रकारचे कर भरलेले नसतात. असा हा चोरटा पैसा खाजगी कुरियर सेवेच्या मार्फत पाठविण्याचा प्रघात पडलेला आहे. केवळ मुंबईच नव्हे तर देशातल्या अनेक शहरांमध्ये लाखो, करोडो रुपयांची देवाण-घेवाण कुरियर (अंगडिया) सेवेच्या मार्फत केली जात आहे. आता ही गोष्ट नवी राहिलेली नाही.

कुरियर किंवा अंगडिया सर्व्हिस ही पन्नास वर्षांपूर्वी भारतात सुरू झाली. सुरुवातीला या सेवेतून काही ठराविक व्यापार्‍यांचे किंमती हिरे नेले जात असत. अशा प्रकारच्या हिर्‍यांची वाहतूक पोस्टातून करणे धोकादायक होते. म्हणून बड्या व्यापार्‍यांनी प्रोत्साहन देऊन ही सेवा वाढवली. पुढे तिच्यामार्फत पत्रेही जायला लागली आणि या पत्रांच्या सेवेला सुद्धा प्रतिसाद मिळाला. कारण या सेवेतून पत्रे तातडीने जातात आणि पत्र मिळाल्याची पोच सुद्धा मिळते. ज्या पैशाची नोंद करणे गैरसोयीचे आहे असे पैसे सुद्धा कुरियर सेवेतून पाठवले जायला लागले आहेत. शेवटी कुरियर ही पर्यायी खासगी अशी समांतर टपाल सेवा आहे. त्यामुळे टपालातून ज्या ज्या सोयी दिल्या जातात त्या सगळ्या कुरियरमधूनही दिल्या जात आहेत. परंतु कुरियरमधले पैशाचे व्यवहार टपाल खात्याप्रमाणे होत नाहीत. प्रत्यक्ष पैशाची वाहतूक करावी लागते. कुरियरमधून पाठवले जाणारे पैसे म्हणजे नोटा आहेत तशाच दुसर्‍या टोकाला नेल्या जातात आणि त्यातून असे घबाड सापडते. हा नेहमीचा व्यवहार आहे. परंतु सध्या आपल्या देशामध्ये एका श्रीमंत वर्गात पैशाची खरोखरच रेलचेल झालेली आहे. करोडोंचे व्यवहार ही गोष्ट त्यांच्यासाठी किरकोळ आहे. गुजरातेतले अनेक व्यापारी मुंबईत व्यापार करतात. अशा व्यापार्‍यांची ही रक्कम मालमोटारीतून नेली जात होती. अर्थात ही सगळी रक्कम किती व्यापार्‍यांची मिळून आहे याचा छडा अजून लागायचा आहे. पण कुरियर सेवेसारख्या खाजगी सेवेतून अब्जावधी रुपयांची देवाण-घेवाण होते ही आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी धक्कादायक बाब आहे. कुरियर सेवेला पैशाची वाहतूक करण्यास बंदी नाही असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. परंतु तूर्तास तरी असा कोणताच कायदा समोर आलेला नाही. फार तर यातले काही पैसे बेहिशेबी असतील तर ते पाठवणार्‍या व्यापार्‍यांची चौकशी होईल.

Leave a Comment