कॅटरिनाने धरला बिछाना

बॉलीवूडमध्ये नशीब काढण्यासाठी रोज शेकडो जण मुंबापुरीत दाखल होतात. नवागतांच्या गर्दीमुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आजकाल एवढी स्पर्धा वाढली आहे की, आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक कलाकार काहीतरी वेगळे करून दाखविण्यासाठी धडपडत असतो. हटके करून दाखविण्याच्या नादात आपल्या आरोग्याची फिकीर त्यांना वाटत नाही. अभिनेत्री कॅटरिना कैफसोबतही हल्ली असेच झाले आहे. प्रचंड कामाचा व्याप व एका सेटवरून दुसरीकडे सतत धावपळ करणारी कॅटरिना सध्या तापाने फणफणली आहे. अत्याधिक थकवा हे त्यामागचे कारण असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. गेल्या आठवड्यात अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये नजरेस पडलेली कॅटरिना मागील चार दिवसांपासून तिच्या चित्रपटांच्या सेटवर फिरकलेलीच नाही. तिला तापाने घेरले आहे व त्यामुळे तिची प्रकृती एकदम खालावली असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.

दुसरीकडे कॅटरिनाच्या एका मैत्रिणीने सांगितले की, आपल्या एका आगामी चित्रपटासाठी तिला जिमनॅस्टिक्सचा प्रचंड सराव करावा लागत आहे. त्यात चित्रणाचे भरगच्च शेड्युल आणि अन्य कार्यक्रम या सगळ्य़ांनी तिला असे काही थकवून टाकले आहे की, बिचारी गेल्या चार दिवसांपासून तापाने फणफणली आहे. अशा परिस्थितीत आपल्या चित्रपटांच्या चित्रणालाही जाणे तिला शक्य नाही. डॉक्टरांनी कॅटरिनाला आणखी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तिला पुन्हा कधी सेटवर दाखल होईल याबाबत सध्यातरी काहीच सांगितले जाऊ शकत नाही. पूर्ण बरे वाटेल तेव्हाच कॅटरिना कामावर परतेल, असे तिच्या निकटवर्तीयांनी म्हटले आहे. कॅटरिना सध्या आपल्या भूमिकांमध्ये जास्त प्रयोगशीलता दाखवत आहे, पण काहीतरी हटके वा चांगले करून दाखविण्याच्या नादात भलतीच समस्या उद्भवणार नाही, याचीही काळजी तिने घेतलेली बरी.

Leave a Comment