आर. आर. पाटीलांनी प्रवचनकार व्हावे – भाजपाच्या फडणविसांचा सल्ला

ठाणे, दि.३ – गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गृहखाते सोडून राष्ट्रीय प्रवचनकार व्हावे अशी टीका आज (मंगळवार) भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणविस यांनी केली. मुंबई सेन्ट्रल येथे ट्रकमधून 1500 ते 2000 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. गेले अनेक दिवस हे पैसे पाठवण्याचे काम सुरु असणार असा आरोपही फडणविसांनी केला आहे. भाजपच्या ठाणे आणि कोकण विभागीय मेळाव्याचे आयोजन ठाण्यातील शहनाई हॉलमध्ये करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी फडणविस ठाण्यात आले होते. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या धोरणांचीही चर्चा केली.

महाराष्ट्रात गुन्हेगारांवर गृहखात्याचा वचक नसल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गृहखाते झोपलेले असल्याने, गुन्हेगारीस आळा बसत नाही. त्यामुळे आर. आर. पाटलांनी गृहखाते सोडून राष्ट्रीय प्रवचनकार व्हावे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंडेंच्या वक्तव्याचा संदर्भरहित अर्थ घेऊ नये, असे स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केले. मुंडे यांनी पुस्तक प्रकाशनात वेगळ्या संदर्भात ते वक्तव्य केले होते. तसेच निवडणूक आयोगाकडे मुंडे खुलासाही करणार आहेत,त्या्वेळी हे स्पष्ट होईल, असेही फडणविस यांनी सांगितले. इस्टर्न फ्री वे’ ला नाव देण्यावरून जो वाद सुरु केला आहे, तो अतिशय अयोग्य असून यावर योग्य तो विनिमय करून मगच निर्णय घेण्यात यावा असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले असून इस्टर्न फ्री वे’ नाव देण्यावर चालू असलेल्या राजकारणात भाजपने सावध भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे संविधानिक जिल्ह्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित 11 जिल्ह्यांच काम बाकी असून ते पूर्ण झाल्यावर शहर अध्यक्षांची नावे घोषित केली जातील, अशीही माहिती फडणविस यांनी दिली.

Leave a Comment